पदुचेरीत काँग्रेसला धक्का; 4 आमदारांच्या राजीनाम्याने या राज्यातील काँग्रेसचं सरकार अल्पमतात

पदुचेरी – देशातील अनेक राज्यात यापूर्वीच काँग्रेस पक्षाला राजकीय धक्के बसले आहेत. काँग्रेसच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी काँगेसची साथ सोडली आहे. त्यामुळे देशातील अनेक राज्यात काँग्रेसचं सरकार अल्पमतात गेलं आहे. आता या यादीत आणखी एका राज्याचा समावेश झाला आहे. पुदुचेरी या केंद्र शासित प्रदेशातील काँग्रेसच्या चार आमदारांनी एकत्रित राजीनामा दिल्याने आणि एक आमदार अयोग्य घोषित झाल्याने तेथील काँग्रेसचं सरकार अल्पमतात आलं आहे.

पुदुचेरी विधानसभेत काँग्रेस नेते व्ही. नारायणसामी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने बहुमत गमावलं आहे. त्यामुळे पुदुचेरी विधानसभेची निवडणूकीच्या तोंडावर हा काँग्रेसला खूप मोठा धक्का समजला जात आहे. पुदुचेरी विधानसभा निवडणुकीबाबत विशेष चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुदुचेरीला जाणार होते. याच पार्श्वभूमीवर सरकार गडगडल्याने काँग्रेस पक्षाची पुदुचेरीमध्येही नाकाबंदी झाली आहे.

2016 सालच्या विधानसभा निवडणूकीत काँग्रेस पक्षाने पुदुचेरीमध्ये 15 जागावर विजय मिळवला होता. तर काँग्रेसची सहकारी पक्ष डीएमकेने 4 जागांवर विजय संपादन केला होता. शिवाय एका अपक्ष आमदारानेही या आघाडीला पाठिंबा दिला होता. पण एकाच वेळी पाच आमदार गमावल्याने पुदुचेरीमध्ये काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. शिवाय बहुमत गमावल्याने तेथील सरकार अल्पमतात आले आहे. गेल्या काही दिवसांत काँग्रेसच्या आमदारांनी एकापाठोपाठ एक असे राजीनामे दिले आहेत. तर काहींनी ट्वीट करून राजीनाम्याची घोषणा केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुदुचेरीच्या नायब राज्यपाल किरण बेदी आणि मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांच्यात वाद सुरू आहे. राज्यपाल किरण बेदी काम करू देत नसल्याचा आरोप नारायणसामी यांनी केला होता. त्यासंदर्भातलं पत्रंही त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दिलं होतं. या पत्राद्वारे त्यांनी किरण बेदी यांना हटवण्याची मागणी केली होती. ‘नायब राज्यपालांकडून सरकारी अधिकाऱ्यांना धमक्या मिळत आहेत. त्यामुळे आम्ही मोकळेपणाने काम करू शकत नाही, असा आरोप नारायणसामी यांनी केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here