अकरा वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या मुख्याध्यापकाला फाशीची शिक्षा

पाटणा (बिहार) – 11 वर्षीय विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या खासगी शाळेतील मुख्याध्यापकाला पाटणा न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. सोबतच त्याला 15 लाख रुपयांची नुकसानभरपाई पीडितेला देण्याचे आदेश देण्यात आले.या शिवाय एक लाख रुपयांचा दंडही या आरोपीला ठोठावण्यात आला आहे.

या पीडितेचे वडील मजूर आहेत. अरविंद कुमार उर्फ राज सिंघानिया असे या नराधम मुख्याध्यापकाचे नाव आहे. या मुख्याध्यापकाला या कृत्यात साथ देणारा दुसरा शिक्षक अवधेश कुमार यालाही दोषी ठरवून त्याला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ही रक्कमही या पीडितेला देण्याचा आदेश देण्यात आला.

पाटण्यातील मित्रमंडळ कॉलनीमधील न्यू सेंट्रल पब्लिक स्कूलमध्ये 2018मध्ये घडला होता. “”या गुन्ह्याची गंभीरता पाहता मुख्य आरोपी अरविंद कुमार याला प्रमुख शिक्षा देण्यावाचून दुसरा पर्याय रहात नाही”, असे निरीक्षण न्यायालयाने निकाल देतान नमूद केले. या मुलीला उलट्या चालू झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिचे वडील तिला डॉक्‍टरांकडे घेऊन गेले, त्यावेळी तिच्यावर बलात्कार झाल्याचे डॉक्‍टरांनी स्पष्ट केले, असे सरकारी वकील सुरेशचंद्र प्रसाद यांनी सांगितले.

सप्टेंबर 2018 मध्ये तिच्या पालकांनी पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवला. त्यानंतर त्या दोघांना तातडीने अटक करण्यात आली. तिची वही मुख्यध्यापक तपासत असल्याचे सांगून शिक्षक अभिषेक यांनी अरविंदकडे या मुलीला पाठवले. शाळेच्या खोलीत बेड ठेवलेल्या एका खोलीत अरविंदने तिच्यावर बलात्कार केला. अशा पध्दतीने त्याने सहा महिन्यांच्या काळात सहा वेळा बलात्कार केला. न्यायालयाच्या परवानगीनंतर पाटणा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात या मुलीचा गर्भपात करण्यात आला.

ही घटना कर्णोपकर्णी होताच ही शाळा बंद करण्यात आली. या खटल्यात पीडिता आणि महिला तपास अधिकारी अंमलदार रवीरंजना कुमारी यांच्या सह सहा जणांची साक्ष तपासण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here