जयपूर (राजस्थान) – राजस्थानची निलंबित उपविभागीय अधिकारी पिंकी मीणा हिचं मंगळवारी लग्न पार पडलं. 10 लाख रुपयांची लाच घेण्यापूर्वीच पिंकी मीणा हिला अटक करण्यात आली होती. धक्कादायक बाब ही होती की तिथल्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सुरू असतानाच तिने ही लाच मागितली होती. पिंकीने लग्नासाठी न्यायालयाकडे जामीन मागितला होता, जो मंजूर करण्यात आला आहे. पिंकीचा नवरा हा देखील सरकारी अधिकारी असून त्याचं सध्या प्रशिक्षण सुरू आहे.
पिंकीचं लग्न अतिशय धूमधडाक्यात आणि आलिशान पद्धतीने करण्यात आलं. विवाहासाठी एक गार्डन सजवण्यात आलं होतं. याच ठिकाणी आधी तिची सप्तपदी होणार होती, मात्र नंतर गुपचूप पद्धतीने तिच्या राहत्या घरी लग्नविधी झाला आणि सप्तपदीही तिथेच पार पडली. ज्या गार्डनमध्ये पिंकीचं लग्न होणार होतं तिथलं भाडं एका दिवसासाठी 4 लाख रुपये इतकं आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पिंकीला अटक करण्यापूर्वीच हे गार्डन भाड्याने घेण्यात आलं होतं, असं सांगण्यात आलं आहे. पिंकीच्या घरात लग्नसोहळा पार पडल्यानंतर जेवणखाणं आणि वऱ्हाडाचं स्वागत या दोनच गोष्टी या गार्डनमध्ये ठेवण्यात आल्या होत्या.
13 जानेवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने राजस्थानातील दौसातील बांदीकुईची उपविभागीय अधिकारी पिंकी मीणा हिला अटक केली होती. दौसातील रस्तेकामात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी पिंकी हिने कंत्राटदाराकडे 10 लाखांची लाच मागितली होती. इतक्या मोठ्या पदावरील अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडल्याने राजस्थानात खळबळ उडाली होती. पिंकीने न्यायालयात धाव घेत लग्नासाठी 10 दिवसांचा जामीन मिळावा अशी विनंती केली होती. ही विनंती न्यायालयाने मान्य केली होती. 21फेब्रुवारीला पिंकीला पुन्हा तुरुंगात जावं लागणार आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी गेल्या महिन्यात सरकारी अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक बोलावली होती. बैठकीत ते भ्रष्टाचाराबद्दल बोलत असताना पिंकी मीणा ही फोनवरून लाचेचे पैसे केव्हा आणि कसे द्यायचे याचं कंत्राटदाराला मार्गदर्शन करत होती. तिने मिटींग सुरू असतानाच सांगितलं की ‘तुमच्या अधिकाऱ्याकडे पैसे देऊन ठेवा, 2 बैठका झाल्यानंतर मी त्याच्याकडून घेईन.’ बैठक संपल्यानंतर पिंकी बाहेर आली आणि तिथेच तिला अटक करण्यात आली. पिंकीप्रमाणेच दौसाचे दुसरे एक अधिकारी पुष्कर मित्तल यांनाही याच लाचप्रकरणात अटक करण्यात आली आहे. याशिवाय पोलीस अधीक्षक मनीष अग्रवाल यांनाही लाचप्रकरणी अटक करण्यात आली आहे.






