जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – शहरापासून काही अंतरावर असलेल्या धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील खान्देश बहुद्देशीय संस्था संचलित, कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड टेक्नालॉजी, नॉर्थ महाराष्ट्र नॉलेज सिटी या महाविद्यालाचे प्राचार्य डॉ. विलास मुलचंद पाटील यांना महाविद्यालयातच त्यांच्या दालनाबाहेर चार ते पाच जणांनी शस्त्राचा धाक दाखवून बेदम मारहाण केल्याची घटना घडली. उद्यापासून कामावर येवून नको अशीही धमकीही संबंधितांकडून देण्यात आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 17 रोजी दुपारी प्राचार्य डॉ. विलास पाटील हे नेहमीप्रमाणे त्यांच्या दालनात होते. यावेळी अचानकपणे रतिलाल वना पाटील, विलास दत्तात्रय नायर, नितीन रामचंद्र नन्नवरे , सौरभ विलास नाईक व इतर गुंड प्रवृत्तीचे दोन ते तीन जण आले.
त्यांनी शस्त्राचा धाक दाखवून प्राचार्य पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच उद्यापासून महाविद्यालयात कामावर येवू नको, असे सांगत जीवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. सद्यस्थितीत महाविद्यालयात तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक सुरु आहे.
याचदरम्यान घडलेल्या भरदिवसाच्या घटनेने विद्यार्थ्यांसह कर्मचार्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. संबंधित मारहाण करणार्यांना तत्काळ अटक करुन महाविद्यालयातय बंदोबस्त द्यावा, अशी मागणी महाविद्यालयातील शिक्षक सचिन पाटील, आय.एस.राणे, पी.डी.शिंपी, एच.एस.राणे यांनी केली आहे. संबंधितांना अटक न झाल्यास सर्व कर्मचार्यांतर्फे उपोषण करण्यात येईल असा इशाराही कर्मचार्यांतर्फे देण्यात आला आहे.






