प्रतापगढ (उत्तरप्रदेश) – प्रेम आंधळं असतं. प्रेमात पडलेला माणूस काहीही करायला तयार असतो. त्याला समाजाचे भय, लोकलज्जा कसलेच बंधन नसते, प्रेमाला योग्य न्याय देणारी व्यक्ती इतरांना नेहमीच उदाहरण ठरते. अशी ‘प्रेम’ या विषयाशी संबंधित अनेक वाक्य कानावर पडत असतात. प्रतापगढमध्ये राहणाऱ्या एका तरुणाने हे प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलंय. त्याचे एका तृतीयपंथीयावर प्रेम होते. काही वर्षांनीच त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. गावकऱ्यांनीही त्यांच्या या निर्णयाचे कौतुक केले.
प्रतापगढ येथे राहणाऱ्या शिवकुमार वर्मा या तरुणाने अंजली सिंह या तृतीयपंथीयाशी वेदमंत्राच्या साक्षीने विवाह केला आहे. अंजली सिंह या प्रतापगढ येथेच राहणाऱ्या आहेत. अयोध्येतील नंदीग्राम येथे भरतकुंडातील एका प्राचीन मंदिरात या दोघांची लग्नगाठ बांधली गेली. विवाहाचे सर्व विधी यथासांग पार पडले. अग्निभोवती सात प्रदक्षिणा घालून शिवकुमार वर्माने तृतीयपंथी अंजली यांचा पत्नी म्हणून स्वीकार केला. दोघांच्याही नातेवाईकांनी त्यांच्या विवाहाला मान्यता दिली.
तृतीयपंथी अंजली सिंह यांची बहीण आणि त्यांचे पती यांनी या दोघांचे लग्न लावून दिले. या विवाहाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या लग्नाला गावातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विवाहाच्या सर्वच विधींमध्ये ते उत्साहाने सहभागी झाले होते. विवाहानंतर त्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यांनी या नवीन जोडप्याला त्यांच्या पुढील संसारिक वाटचालीकरिता ‘नांदा सौख्यभरे’ अशा मंगलमय शुभेच्छाही दिल्या.






