सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) – जिल्ह्यातील ग्रामीण भाग असलेल्या बार्शीतल्या एका तरुण प्राध्यापकानं बनवलेल्या लघुचित्रपटाला तेलंगणामधील एका राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात बाजी मारली आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तयार केलेल्या ‘बुचाड’ या लघुचित्रपटाला सर्वोत्कृष्ट लघुचित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. विशाल गरड असं या तरुण प्राध्यापकाचं नावं आहे. विशाल गरड लिखित आणि दिग्दर्शित बुचाड या लघुचित्रपटाला हा बहुमान मिळाल्यानं सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. विशेष म्हणजे विशाल गरड यांनी सदर पुरस्कार शेतकरी वेशात स्वीकारून तो अवकाळी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भारत देशातील तमाम शेतकऱ्यांना अर्पण केला आहे.

नॅशनल कम्युनिटी मीडिया फिल्म फेस्टिव्हल या राष्ट्रीय स्तरावरील चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुचित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. सदर पुरस्कार युनेस्कोचे प्रा.प्रविण पवराला यांच्या हस्ते विशाल गरड यांना प्रदान करण्यात आला. याप्रसंगी डी.डी.एसचे डायरेक्टर पी.व्ही.सतीश, प्रसिध्द तेलगु दिग्दर्शक नाग अश्विन, राजेंद्र पाटील, चिन्ना परसम्मा, हैदराबाद विद्यापीठातील प्रा.कांचन मलिक आदी मान्यवर उपस्थित होते.
‘बुचाड’चे छायाचित्रण सचिन नलावडे यांनी केले आहे तर संकलन अमोल लोहार यांनी केले आहे. या लघुचित्रपटात विशाल गरड, वैष्णवी जानराव, वैष्णवी काळे, कादंबरी गरड यांच्या मुख्य भूमिका आहेत.






