भोपाळ (मध्यप्रदेश) – येथील कोलार परिसरामध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. निक्की (नाव बदलेलं आहे) असं या तरुणीचं नाव असून आरोपीनं तिच्या डोक्यावर दगड मारला. त्याने ढकलून दिल्यानं ती खडड्यात पडली त्यात तिच्या पाठीचा मणका तुटला. त्यानंतर तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या तरुणीवर सध्या एम्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिच्या पाठीच्या मणक्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून 42 टाके पडले आहेत. तिला सध्या स्वत:हून हालचालही करता येत नाही.
या घटनेबाबत सांगताना निक्की म्हणाली, 16 जानेवारीला मी संध्याकाळी साडेसात वाजता नेहमीप्रमाणे वॉकला निघाले होते. जे. के. रुग्णालयाच्या शेजारुन दानिशकुंज चौकाच्या दिशेने रस्त्याच्या कडेने चालत होते. तेव्हा रुग्णालयापासून 200 मीटर अंतरावर असलेल्या नर्सरीजवळ समोरुन एक तरुण येताना दिसला. जवळ आल्यानंतर त्याने मला जोरात धक्का दिला. मी रस्त्याच्या कडेला असलेल्या पाच फूट खोल खड्ड्यात पडले. त्यामुळे माझ्या पाठीचा मणका तुटला. त्याने मला जबरदस्ती ओढत झुडपामध्ये नेले. त्याने माझ्या शरीरारवर चावा घेण्यास सुरुवात केली. तो गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करत होता. मी माझा बचाव करण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याने मला मारहाण केली. मी जोरजोरात ओरडायला लागले, तर तो माझ्या डोक्यात दगड मारु लागला. मला समजत नव्हतं काय करु. क्षणभर मला वाटले की तो मला जिवंत नाही सोडणार. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी मी त्याच्याकडे विनंती करु लागले. ‘तू माझ्यावर बलात्कार कर, मी अजिबात ओरडणार नाही. कोणाला फोनसुद्धा करणार नाही, पण तू माझा जीव घेऊ नकोस.
मला थोडासा श्वास घेऊ दे, असं मी त्याला म्हणाले. त्यानंतर त्याने मला दगड मारणं बंद केलं. मी मदतीसाठी आरडाओरडा केला. सुदैवानं माझा आवज तिथून जाणाऱ्या तरुण-तरुणीनं ऐकला. दोघंही झुडपामध्ये आले. त्या दोघांना पाहताच तो मला तिथेच सोडून पळून गेला, असं निक्कीनं सांगितलं.
दरम्यान पोलीस आमची दिशाभूल करत आहेत, असा आरोपही तिने केला. कोलार पोलीस 17 जानेवारीला एम्समध्ये आले. त्यांनी दानिशकुंज चौकाजवळील ज्युस सेंटरवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज ताब्यात घेतले. ज्यामध्ये तो मला समोरुन धक्का देताना दिसत आहे. हा जीवघेणा हल्ला होता, बलात्काराचा प्रयत्न होता. तरीसुद्धा पोलिसांनी सामान्य हल्ला म्हणून केस रजिस्टर केली. माझी आई मला व्हिलचेअर, स्ट्रेचरवरुन पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यास तयार आहे. जेणेकरुन आरोपीला मी ओळखू शकेल. पण पोलीस आरोपीचा फोटो दाखवत नाहीत किंवा त्याला माझ्यासमोर आणतही नाहीत. माझ्या आईनं या मंगळवारी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मदत मागितली आहे.






