भरधाव जाणाऱ्या ट्रकचा सिनेस्टाईल पाठलाग; २५ लाखाहून अधिक किंमतीचा गुटखा जप्त

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – पुण्यातील वानवडी पोलिसांनी अंदाजे २५ लाख रुपये किंमतीचा गुटखा आणि सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला आहे. एका ट्रकमधून गुटख्याची अवैध वाहतूक केली जात होती. वानवडी पोलिसांच्या पथकाने ट्रकचा पाठलाग करून झडती घेतली. ट्रकमध्ये गुटखा वाहून नेला जात होता.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने मागील काही दिवसांपासून गुटख्याच्या साठा करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई केली जात आहे. शुक्रवारी लुलानगर चौकात ट्रकमधून गुटखा व तंबाखू जन्य पदार्थ लपवून घेऊन जात होते. याबाबतची माहिती वानवडी पोलिसांना मिळाली होती. वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्या मार्गदर्शनानुसार तपास पथकातील भोलानाथ अहिवळे यांच्या पथकाने ट्रकचा पाठलाग करून ट्रक ताब्यात घेतला.

pune-gutkha

ट्रकमध्ये आतील बाजूस ज्वारी व गव्हाच्या पोत्यामध्ये गुटखा आणि सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ असल्याचे आढळून आले. पोलिसांनी ट्रक वानवडी पोलीस ठाण्यात आणला. जप्त केलेला मुद्देमाल अंदाजे २५ लाख रुपयांहून अधिक किंमतीचा असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून, हा गुटखा कुठे घेऊन जात होता, याबाबत त्याची चौकशी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here