नवरदेवाला हळद लागताना घरात तिघांवर हल्ला

marhan

कल्याण : कल्याणमधील सापर्डे गावात एक धक्कादायक प्रकार घडला येथील एका हळदीच्या कार्यक्रमात घरातील तिघांवर अज्ञातांकडून जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दोघांवर उपचार सुरु आहेत.

हळद कार्यक्रम सुरु असताना घरात असलेल्या तीन जणांवर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना कल्याणमधील सापर्डे गावात घडली आहे. या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर दोन जणांवर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. लूटच्या उद्देशाने हा प्रकार घडला आहे, की यामागे दुसरं काही कारण आहे, याचा तपास खडकपाडा पोलीस करीत आहेत.

रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास कल्याण पश्चिमेतील सापर्डे गावात एका तरुणाचा हलदी कार्यक्रम सुरु होता. गावातील लोक या कार्यक्रमात व्यस्त होते. याच दरम्यान ज्या तरुणाचा हळदी कार्यक्रम सुरु होता त्याच्या जवळच राहणाऱ्या नातेवाईकच्या घरी अज्ञातांकडून तीन जणांवर प्राणघातक हल्ला झाला.

यात सुवर्णा गोडे या महिलेचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. तर भारती म्हात्रे आणि पवन म्हात्रे हे दोघे गंभीर जखमी झाले. स्थानिक नगरसेवक जयवंत भोईर यांचा म्हणणे आहे की लुटीच्या उद्देशाने ही घटना घडली आहे. कारण मृत महिलेचे सर्व दागिने गायब आहेत. ही घटना दुर्दैवी आहे. 12 तासात पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला पाहिजे. नाहीतर शिवसेना आंदोलन करणार, असा इशाराही त्यांनी दिला.

याबाबत खडकपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक पवार यांचे म्हणणे आहे की, या घटनेत एकाचा मृत्यू तर दोन जण जखमी आहेत. मात्र, ही घटना नक्की लुटीच्या उद्देशाने झाली आहे की नाही, याचा तपास सुरु आहे. यामागे दुसरं काही कारण आहे का, या दृष्टिकोनातून सुद्धा तपास सुरु आहे. मात्र, या घटनेमुळे कल्याणमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here