जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – तालुक्यातील कानळदा येथे दोन दिवसांवर लग्न येऊन ठेपलेल्या एका तरुणीस ‘तु लग्न कसे करते ते पाहतो’ असे म्हणत रोहन साहेबराव सपकाळे (रा.अंजाळे, ता.यावल) या तरुणाने धमकी देऊन तिचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
रोहन साहेबराव सपकाळे (रा. अंजाळे, ता. यावल) हा गेल्या अनेक दिवसांपासून या तरुणीची छेड काढतो आहे. दरम्यान, या तरुणीचे लग्न ठरलेले असून २५ रोजी गावातच लग्न समारंभ आयोजित केला आहे. तत्पूर्वी २३ रोजी रोहनने तरुणीचे गाव गाठुन तीला धमकी दिली. तीचा विनयभंग केला.
याप्रकरणी तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी अनिल फेगडे तपास करीत आहेत. दरम्यान, तरुणीच्या लग्नात बाधा येऊ नये म्हणून गुन्हा दाखल होताच रोहनला अटक करण्यासाठी अंजाळे गावात पोलिस गेले होते. परंतु, रोहन घरी मिळुन आला नाही. तरुणीस धमकी दिल्यानंतर मोबाईल बंद करुन तो बेपत्ता झाला आहे.






