वायनाड – तामिळनाडू, केरळ आणि पश्चिम बंगालसह पाच राज्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. ते केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर सातत्याने हल्ले चढवत आहेत. तामिळनाडूत प्रचारासाठी आलेल्या राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान मोदी देशहित बाजूला सारत आपल्याशी समझौता करतील, हे चीनला माहित असल्यानेच त्यांनी आपल्या भूभागात घुसखोरी केल्याचे राहुल गांधी म्हणाले. विविध संस्था आणि प्रसारमाध्यमांवर भाजप सरकार दबाव टाकत त्यांची मुस्कटदाबी करत आहे. तसेच आपण भ्रष्टाचारी नसल्याने भाजप आपल्याला नेहमी लक्ष्य करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
लोकशाही एका झटक्यात संपवता येत नाही, ती हळूहळू संपवण्याचे काम भाजपा करत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी थुथुकुडी येथे केला. यावेळी राहुल गांधी यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरही भर दिला. न्यायव्यवस्था, संसद आणि महत्त्वाच्या ठिकाणी महिला आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले. हिंदुस्थानी पुरुषांनी महिलांबाबतची मानसीकता बदलण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उपयोगी आहेत किंवा नाही, हा मुद्दा नाही. ते कोणासाठी उपयोगी आहेत, हा मुद्दा आहे. अदानी आणि रिलायन्ससारख्या उद्योगांसाठी ते उपयोगी आहेत. मोदी या उद्योगांसाठी आणि उद्योगपतींसाठी फायदेशीर आहेत. ‘हम दो हमारे दो’ परिवारातील व्यक्ती आपली संपत्ती वाढवण्यासाठी पंतप्रधानांचा वापर करून घेत आहेत. त्यांच्यासाठी पंतप्रधान मोदी उपयोगी आहेत. मात्र, सर्वसामान्य आणि गरीबांसाठी पंतप्रधान मोदी उपयोगी नसल्याचे त्यांनी सांगितले.
एक देश एक भाषा यावरूनही राहुल गांधी यांनी मोदी यांच्यावर हल्ला चढवला. तामिळनाडूमध्ये तामिळ ही महत्त्वाची भाषा आहे. प्रत्येक राज्याची स्वतःची भाषा असून त्याला महत्त्व आहे. एक देश एक भाषाद्वारे पंतप्रधान सर्व देशावर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न का करत आहेत, असा सवालही त्यांनी केला. रिमोट कंट्रोलद्वारे तामिळनाडूवर नियंत्रण ठेवता येईल, असे मोदी यांना वाटत आहे. मात्र, आम्ही रिमोटमधूनल बॅटरी काढून घेऊ आणि त्यांच्याकडून कंट्रोल खेचून घेऊ, असे ते म्हणाले. तामिळनाडूला कंट्रोल करण्याची कोणाचीही इच्छा पूर्ण झालेली नाही. सर्वसामान्याचे संरक्षण करणारे आणि त्यांच्यावर लाठीमार, गोळीबार न करणारे सरकार तामिळनाडूमध्ये स्थापन करणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.






