सिझेरियननंतर टाके न घातल्याने अतिरक्तस्त्रावाने बाळंतिणीचा मृत्यू

लातूर – सिझेरियन पद्धतीने प्रसूती केल्यानंतर महिलेला डॉक्टरने टाकेच न घातल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना लातूर जिल्ह्यात समोर आली आहे. ऑगस्ट 2020 मध्ये ही घटना घडली होती. मात्र या घटनेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा अहवाल आता आला असून त्यात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे. डॉ.ममता वोरा यांच्या विरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, लातूर तालूक्यातील मौजे भडी येथील रेश्मा बाळासाहेब नरहारे हीला प्रसुतीसाठी श्री प्रभा हॉस्पीटल येथे दाखल करण्यात आलेले होते. डॉ.ममता वोरा यांच्याकडेच रेश्मा नरहारे ही नियमीत तपासणी करता यायची. 16 ऑगस्ट 2020 रोजी प्रसुतीसाठी त्यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते. रात्री 8.50 वाजता सिझर करण्यात आले व मुलगा झाला. दुसऱ्या दिवशी दुपारी 1.15 वाजता रुग्णास ऑक्सिजनची आवश्यकता आहे असे सांगून तिथून पुढील उपचारासाठी गॅलक्सी हॉस्पिटल येथे पाठवण्यात आले. तेथे रुग्णाला रक्ताची गरजआहे असे सांगून 10 रक्ताच्या पिशव्या आणण्यास सांगितले. परंतु नंतर रक्त देता येणार नाही असे सांगून 5 वाजता रेश्मा नरहरे हिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आलेली होती.

मयत महिलेचा नवरा बाळासाहेब नरहरे यांनी पत्नीचा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचा जबाब दिलेला होता. त्यामुळे या संदर्भात सर्व कागदपत्रे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या समितीकडे पाठवण्यात आलेली होती. या समितीचा अहवाल प्राप्त झाला व त्यामध्ये सिझर करताना टाके घातले नाहीत म्हणून रक्तस्त्राव झाला व रुग्णाचा मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले. त्यामुळे गुरुनाथ किशनराव भताने पोलीस कर्मचारी यांनी सरकार पक्षातर्फे दिलेल्या तक्रारीवरुन डॉ.ममता वोरा यांच्या विरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here