चंदीगड (पंजाब) – एका घरमालकाने भाडेकरूला काठीने बदडून ठार केल्याची भयावह घटना समोर आली आहे. घरमालकाने 1 हजार रुपयांसाठी काठीने बदडून मारल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मृत व्यक्तीच्या चुलत्याने घरमालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी घरमालकाला बेड्या ठोकल्या असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना पंजाबमधील लुधियाना येथील आहे. येथील गगन नगरमध्ये राहणाऱ्या गब्बर सिंह नामक घरमालकाने 28 वर्षीय विजय मौर्या याची हत्या केली आहे. मृत व्यक्तीचा चुलता रात्रपाळी करून सकाळी घरी परतला होता. यावेळी त्यांने बाहेरुन बराच वेळ घराचा दरवाजा वाजवला तरीही पुतण्याने घराचं दार उघडलं नाही. त्यामुळे चुलत्याने खिडकी तोडून घरात प्रवेश केला. घरात शिरल्यानंतर त्यांनी पाहिलं की, विजयचा मृतदेह बेडवर पडला होता. हे पाहून त्यांना धक्काच बसला. यानंतर त्यांनी घरमालक गब्बर सिंह विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी मृत विजयचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याशिवाय पोलिसांनी घटनास्थळावरून रक्ताने माखलेली काठी जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय मौर्या हे गेल्या सहा महिन्यांपासून गब्बर सिंहच्या घरात भाडे तत्त्वावर राहत होते. विजय हा आरती स्टील कारखान्यात मशीन ऑपरेटर होता. विजय रात्री कामावरून घरी आला, तेव्हा घरमालकाने त्याच्यावर एक हजार रुपये चोरी केल्याचा आरोप केला.
यानंतर आरोपीने विजयला खोलीत बंद केलं आणि काठीने बेदम मारहाण करायला सुरुवात केली. तब्बल अर्धा तास मारहाण केल्यानंतर, पीडित व्यक्ती अर्धमेल्या अवस्थेत पोहचला. त्यानंतर आरोपीने तेथून पळ काढला गेला. तक्रारीत असं म्हटलं आहे की, घटनेच्या वेळी आरोपींने दारु प्यायली होती. विजयची पत्नी आणि दोन मुलं त्याच्या गावी राहतात आणि तो गेल्या सहा महिन्यांपासून गब्बर सिंहच्या घरी एकटाच भाडे तत्त्वावर राहत होता.
मृताचे चुलते रामनाथ यांनी सांगितलं की, गब्बर सिंहने विजयला काठीने मारहाण केल्यानंतर तो पळून गेला होता. मृताचे चुलते पुढे म्हणाले की, ‘सकाळी विजयचा फोन आला नाही, त्यामुळे त्याला भेटायला मी विजयच्या घरी गेलो. तेव्हा विजयचा मृतदेह पलंगावर पडला होता. रामनाथ यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी गब्बर सिंहला अटक केली आहे.






