(योगेश शुक्ल, जळगाव)
स्वत:ला झोकून देऊन केलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांना विलक्षण मोहिनी घातली होती. 2 मार्च त्यांचा 33 वा स्मृतिदिन. त्यांच्या अकाली घेतलेल्या एक्झिटने सार्या नाट्यरसिकांच्या काळजाचा ठोका चुकवला होता.
त्या काळातील असामान्य लोकप्रिय कलावंतांच्या यादीत अग्रक्रमाने नाव घेतले जायचे ते म्हणजे डॉ.काशीनाथ घाणेकर यांचे. स्वतःचा वरळी येथील डेंटल क्लिनिकचा व्यवसाय सांभाळून ते नाटक करीत असत, मात्र नाटक हा त्यांचा व्यवसाय नव्हता तर ते त्यांचे सर्वस्व होते, जीवन होते, ध्येय होते.
रंगमंचावर एंट्री करताच ते एक विलक्षण वातावरण निर्माण करीत असत. त्यांच्या आगमनाबरोबर नाट्यगृहात लकाकणारे झुंबर पेटल्यासारखे वातावरण निर्माण व्हायचे. किती पाहू, किती नको अशा जिव्हाळ्याने सर्वसामान्य प्रेक्षक काशीनाथ घाणेकरांचा अभिनय पहात असत. ते एक बुध्दिमान नट तर होते पण तेवढेच भावनाप्रधानही होते.
60 – 70 दशकातील नाट्यप्रेमींना वेड लावणारा हा कलंदर कलावंत व्यवसायाने डेंटल सर्जन होता. डॉक्टरांची रंगमंचावर पहिली एन्ट्री झाली ती गारंबीचा बापू या नाटकातून. त्याचे त्यांनी अनेक वर्ष प्रयोग केले. पण त्यांचा अभिनय गाजला तो प्रभाकर पणशीकरांच्या नाट्यसंपदाकडून झालेल्या अश्रूंची झाली फुले या नाटकातील लाल्या या भूमिकेपासून. या नाटकाचा एवढा प्रभाव होता की हिंदी चित्रपटसृष्टीला या नाटकाचे आकर्षण निर्माण होऊन आसू बन गये फुल या नावाने अशोक कुमार आणि देव मुखर्जी अभिनीत चित्रपट तयार झाला.
डॉक्टर काशीनाथ घाणेकर हे बहुआयामी नट होते. त्यांनी नाटकासोबतच मराठी चित्रपटातूनही कामे केली. मधुचंद्र या चित्रपटातील उमा भेंडे यांच्याबरोबरची भूमिका खूप गाजली होती. याच दरम्यान आले रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकात मा.दत्ताराम शिवाजी करायचे तर डॉक्टर संभाजी ही जुगलबंदी पाहण्यासाठी नाट्यप्रेमी वारंवार या नाटकाला हजेरी लावत असत. शरीरयष्टीने किरकोळ असणारे डॉक्टर पॅडींग लावून आणि मेकअप केल्यानंतर आपल्या घुमारदार आवाज आणि धारदार नजरेच्या सहाय्याने जो संभाजी उभा करत की, प्रेक्षक मध्यंतरात तर सोडाच पण नाटक संपल्यानंतरही त्या वातावरणातून बाहेर येत नसत.
या नाटकातील त्यांची भूमिका पाहून भालजी पेंढारकरांना त्यांना शिवाजीच्या भूमिकेसाठी घेण्याचा विचार झाला होता. मात्र डॉक्टरांचे निळे डोळे तिथे आडवे आले. पण मराठा तितुका मेळवावा मधील मावळ्याची भूमिका आणि शूर आम्ही सरदार आम्हाला हे गाणे सर्वांनाच आठवते. त्यांनी धर्मपत्नी (1953), पाठलाग (1960), मधुचंद्र (1967), एकटी (1968), प्रीत शिकवा मला (1968), अभिलाषा (1968), देवमाणूस (1970), अजब तुझे सरकार (1971), झेप (1971), हा खेळ सावल्यांचा (1976) या चित्रपटांतून कामे केली.






