जळगावच्या महापौर भारतीताई सोनवणे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून जळगावकरांना केले भावनिक आवाहन

  • जळगाव ठरतेय पुन्हा कोरोना हॉटस्पॉट : प्रशासनाला सहकार्यासह स्वतःची काळजी घेण्याचे भावनिक आवाहन

जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – शहरात पहिला कोरोना रुग्ण सापडल्याला आता वर्ष उलटून गेले आहे. प्रशासन, पोलिस, आरोग्य यंत्रणा यांच्या समन्वयाने व जळगावकरांच्या समंजस सहकार्याने कोरोनाला अटकाव करणे शक्य झाले होते. मात्र गेल्या महिनाभरापासून पुन्हा कोरोनाने उचल खाल्ली असून, कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर जळगावच्या महापौर भारतीताई सोनवणे यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून जळगावकरांना भावनिक आवाहन केले आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून केलेल्या आवाहनात त्यांनी सांगितले आहे की, जळगाव शहरात गेल्यावर्षी कोरोनाचा पाहिला रुग्ण सापडला आणि सर्वांच्या हृदयाचा ठोकाचं चुकला. जळगाव शहराच्या प्रथम नागरिक म्हणून आम्ही मध्यरात्रीच रुग्णाचे घर गाठले. नागरिकांना कोरोनाचे गांभीर्य लक्षात आणून दिले. कोरोनापासून लांब असलेले जळगाव शहर अचानक कोरोनाचा हॉटस्पॉट झाले. केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. शहरात रुग्णांची संख्या वाढतच होती, अनेकांनी आपले जिवलग गमावले तर अनेकांचा जीव दैव बलवत्तर असल्याने बचावला.

bharatitai-and-kailasappa-sonawane

व्यवसाय, आस्थापना, उदरनिर्वाहची साधने बंद असल्याने अनेकांचे संसार डबघाईस आले. कोरोना काळात आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली परंतु आम्हाला अशी संधी नको होती. सेवा झाली मात्र कोरोनामुळे जी परिस्थिती पहावयास मिळाली ती फार भयंकर होती. कोरोना काळ असल्याने विकासाचे नवे पर्व उभारण्यापासून आम्ही बरेच लांब राहिलो. नागरिकांचे हाल पाहून डोळे पाणावले. जिल्हा रुग्णालयातील प्रकारानंतर तर मनपाच्या कोविड सेंटरची जबाबदारी जास्तच वाढली. महापौर, नगरसेवक म्हणून मनपाची यंत्रणा हाताशी घेत जे-जे शक्य असेल ते करण्याचा आम्ही प्रयत्न केला.

कोरोना रुग्ण आणि संशयितांशी चर्चा करून वेळोवेळी केलेल्या सुधारणामुळे मनपाचे कोविड सेंटर उत्तम राखण्यात आम्ही यशस्वी ठरलो. मनपा यंत्रणेतील प्रत्येकाचे यात योगदान आहे. आम्ही पदावर असलो किंवा नसलो सामाजिक सेवेचा घेतलेला वसा आम्ही कधीच टाकणार नाही. आजवर शहरात जेव्हा-जेव्हा संकटे आली आम्ही आमची सेवा शहरभर पुरवली. पाणीटंचाई, डेंग्यूची साथ असताना आमचे स्वयंसेवक प्रत्येक प्रभागात सेवा बजावत होते. कोरोना काळात देखील आम्ही समाजसेवेत सातत्य राखले. अनेकांना कोरोना झाला आमच्या कुटुंबात देखील कोरोना येऊन गेला, कोरोना काय असतो अनेकांनी जवळून अनुभवले. ऑक्टोबरनंतर परिस्थिती जवळपास सुरळीत झाली.

नागरिकांनी नियमांची पायमल्ली केली आणि कोरोनाचे सावट पुन्हा गडद होऊ लागले. गेल्या आठ दिवसापासून कोरोनाचे रुग्ण वाढत असून नागरिकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. गतवर्षी भयावह आणि भकास परिस्थिती पुन्हा ओढवून न घेण्यासाठी आपण सर्वांनी मास्क वापरावे, सॅनिटायझरचा उपयोग करणे, दोन व्यक्तींमध्ये ६ फुटाचे अंतर राखणे, वारंवार साबणाने हात धुवावे अशी माझी आपणास कळकळीची विनंती आहे. महापौर म्हणून आमचे काहीच दिवस शिल्लक आहेत परंतु येणाऱ्या महापौरांना आम्ही हाती घेतलेल्या विकासाच्या काही योजना, उपक्रम पुढे कायम राखले जाऊन ते यशस्वी करण्यासाठी आपल्या सर्वांची साथ आवश्यक आहे. कोरोनाचे संकट दूर करणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोरोनाचे रुग्ण कमी झाले तरच पुढील विकासकामांना हात घालणे शक्य आहे. ‘मी जबाबदार’ मोहिमेचे महत्व लक्षात घेत आपणच आपले, परिवाराचे आणि शहरवासियांचे रक्षक आहोत ही बाब लक्षात घेऊन कोरोना स्प्रेडर न होता कोरोना योद्धा व्हावे, ही विनंती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here