लायसन्स नसताना मुलाने गाडी चालवली म्हणून आईवर गुन्हा

हैदराबाद – वाहनातून किंवा स्वतः वाहन चालवून प्रवास करण्याला आजच्या जगात पर्याय नाही. त्यामुळे वाहतुकीच्या नियमांचीही कडक अंमलबजावणी व्हायला हवी पण वाहतुकीच्या नियमांकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातं. मुलांच्या हातात लहान वयातच वाहनं देणं तर नेहमीच दिसतं. असाच एक प्रकार अत्यंत दुर्दैवी पद्धतीने उघडकीला आला. 19 वर्षांच्या मुलाचा अपघाती मृत्यू झाला. पण त्याला लायसन्स नसताना गाडी चालवायची परवानगी दिली म्हणून आईवरही गुन्हा दाखल झाला आहे.

वाहतुकीचे नियम कडक असले, तरी बऱ्याचदा त्यांची अंमलबजावणी गांभीर्याने होत नाही. अर्थातच वाहनचालकांची तशी मानसिकता नसते आणि यंत्रणाही या बाबतीत सदैव काटेकोर राहत नाही. नियम प्रत्येकाने पाळणं का आवश्यक असतं, हे बऱ्याचदा अपघात झाल्यानंतर कळतं. हैदराबाद येथे अलीकडेच झालेला अपघात हे त्याचं एक दुर्दैवी उदाहरण मानता येईल.

जी. योगेश सागर नावाच्या 19 वर्षांच्या युवकाचा गेल्या महिन्यात अपघाती मृत्यू झाला. 23 फेब्रुवारी रोजी योगेशच्या स्कूटरला काँक्रीट मिक्सर ट्रकची धडक बसली आणि त्या अपघातात त्याचा मृत्यू झाला. हैदराबादमधल्या गच्चीबावली परिसरातल्या मस्जिदबांदा इथे हा अपघात घडला होता. हाताशी आलेला मुलगा अपघातात गमावण्याचं दुःख काय असतं, ते त्यांचे पालकच जाणोत; पण यातलं दुर्दैव हे होतं, की त्या युवकाकडे ड्रायव्हिंग लायसेन्स अर्थात वाहन चालवण्याचा परवाना नव्हता. त्यामुळे पोलिसांनी त्याची आई डी. गीता राणी यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. का? तर लायसेन्स नसतानाही त्याला गाडी चालवू दिल्याबद्दल. ‘तेलंगण टुडे’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

ट्रक ड्रायव्हर डी. भुमैया याच्यावरही पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच ट्रकचा मालक कमलाकर रेड्डी याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवजड वाहन असूनही ड्रायव्हर ते अतिवेगाने, बेजबाबदारपणे चालवत होता, तसंच त्या वाहनासाठी निर्बंध असलेल्या वेळेत तो ते चालवत होता, असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. ड्रायव्हरला गच्चीबावली पोलिसांनी अटकही केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here