नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) – बीएस-4 च्या मारुती कंपनीच्या वाहनांना विक्री-बंदी असतानाही या वाहनांची बनावट कागदपत्रे बनवून वाहनांची विक्री करणार्या ९ जणांच्या टोळीला गजाआड करण्यात आले आहे. नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून या कारवाईत जवळपास ७ कोटी १५ लाख रुपये किंमतीच्या १५१ गाड्या हस्तगत केल्या आहेत. याशिवाय बनावट चेसीस नंबर तयार करण्यासाठी वापरलेली मशीन, गाड्यांचे व्यवहार, नोंदणी, विक्रीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तयार करण्याकरिता वापरलेले लॅपटॉप, प्रिन्टर, स्टॅम्प पेपर, रबरी शिक्के, बनावट इन्वाईस, मोबाईल फोन इत्यादी मुद्देमाल या टोळीकडून हस्तगत आले आहे.
बीएस-4 इंजिन असलेल्या वाहनांमुळे प्रदूषणात वाढ होत असल्याने भारत सरकारने वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी मार्च २०२० पासून बीएस-4 इंजिन असेलल्या वाहनांना बंदी घातली आहे. शासनाने बंदी केलेल्या मारुती कंपनीच्या सियाज, ब्रिझा, सेलेरीओ, वॅगनार, इको, बलेनो,एस क्रॉस, अशा वेगवेगळ्या मॉडेलच्या कार पुराच्या पाण्यामध्ये बुडाल्यामुळे या कार मारुती कंपनीने भंगार म्हणून लिलावात काढल्या होत्या. यातील ४०७ कार चेंबुर येथील ऑटोमोटीव्ह मॅन्युफ्रॅक्चर्रस प्रा.लि. या कंपनीने भंगार म्हणून लिलावात विकत घेतल्या होत्या.
मारुती कंपनी सदर कार ताब्यात देण्यापूर्वी सर्व कारच्या चेसीस नंबर कट करुन आरोपी आनम अस्लम सिद्धीकी (वय ४२ वर्षे) याच्या ताब्यात पॅप करण्यासाठी दिल्या होत्या. मात्र आनम सिद्धीकी व त्याच्या इतर साथीदारांनी सदरच्या कार पॅपमध्ये न काढता त्या कारवर पुन्हा बनावट चेसीस नंबर टाकले. तसेच जुन्या रजिस्टर झालेल्या गाड्यांचे इंजीन नंबर व चेसीस नंबरचे बनावट व खोटे कागदपत्र तयार केले. त्यानंतर या टोळीने बनावट कागदपत्रांच्या आधारे सदर कारचे वेगवेगळ्या राज्यातील आरटीओ कार्यालयात वेगवेगळ्या ग्राहकांच्या नावाने नोंदणी देखील केली. त्यानंतर या टोळीने पनवेलच्या शिरढोण भागात कार्यालय थाटून सदर कार पुराच्या पाण्यात खराब झाल्याचे ग्राहकांना खोटे सांगून या कारची २ ते ३ लाखांमध्ये विक्री करण्यास सुरुवात केली. तसेच अनेकांकडून या टोळीने रोख रक्कम देखील स्विकारली. याबाबतची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाल्यानंतर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.बी.कोल्हटकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश गज्जल व त्यांच्या पथकाने पनवेलजवळील शिरढोण येथील कार्यालयावर छापा मारुन यातील काही आरोपींना अटक केली होती.

त्यावेळी पोलिसांना बनावट कागदपत्रे व इतर साहित्य मिळून आले होते. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने या प्रकरणाचा अधीक तपास केल्यानंतर पॅप करण्यासाठी देण्यात आलेली वाहने ते बनावट कागदपत्रांद्वारे विकत असल्याचे आढळुन आले. त्यानंतर मध्यवर्ती कक्षातील पथकाने महाराष्ट्रातील विविध जिल्हे, दिल्ली, हरियाणा, गुजरात, राजस्थान, तेलंगणा, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, पंजाब इत्यादी राज्यात या टोळीने विकलेल्या तब्बल ५ कोटी १५ लाख रुपये किंमतीच्या १५१ कार हस्तगत केल्या. या टोळीने बनावट कागदपत्राच्या आधारे हिमाचल प्रदेश व अरुणाचल प्रदेश आरटीओ कार्यालयात रजिस्ट्रेशन केलेल्या ५ कार देखील हस्तगत केल्या आहेत.
या गुह्याचे तपासामध्ये आरोपी इम्रान युसूफभाई चोपडा (वय ३८ वर्षे) याने सदर कारवर नवीन चेसीस नंबर टाकण्याकरिता औरंगाबाद येथून कॉम्फ्युटराईज मशिन खरेदी केल्याचे आढळून आले आहे. तसेच सदर मशिनद्वारे त्याने इतर आरोपींकडील काही गाड्यांना बनावट चेसीस नंबर तयार करुन त्याद्वारे आरटीओ नोंदणी केल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. ती मशीन हस्तगत करण्यात आली असून या आरोपींनी या गाड्यांचे व्यवहार, नोंदणी, पीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे तयार करण्याकरिता वापरलेले लॅपटॉप, प्रिन्टर, स्टॅम्प पेपर, रबरी शिक्के, बनावट इन्वाईस, मोबाईल फोन इत्यादी मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी दिली. या टोळीने अशा प्रकारे विकलेल्या इतर वाहनांचा शोध घेण्यात येत असल्याचे देखील सिंह यांनी सांगितले.
या कारवाईत पोलिसांनी आनम असलम सिद्धीकी (वय ४२ वर्ष), शाबान रफिक कुरेशी (वय ३२ वर्ष), मनोहरप्रसाद व्यंकटराव जाधव (वय ३१ वर्ष), वसीम मोहम्मद उमर शेख (वय ३१ वर्ष) या चौघांना पनवेल येथून अटक केली. त्यानंतर गौरव सुभाषचंद्र देम्बला (वय ३२ वर्ष) आणि प्रशांत एस.नरसय्या शिवरार्थी (वय २६ वर्ष) या दोघांना दिल्ली व हैद्राबाद येथून तसेच राशीद खान अहमद खान (वय ४२ वर्ष),चंद्रशेखर ज्ञानदेव गाडेकर (वय ३१ वर्ष) या दोघांना पनवेल मधून तर इमरान युसूफभाई चोपडा (वय ३८ वर्ष) याला गुजरात मधील अहमदाबाद येथून अटक केली आहे.






