जळगाव (जिल्हा प्रतिनिधी निलेश पाटील) – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाचे काम संथ गतीने सुरू आहे. यामुळेच जिल्ह्यातील एरंडोल येथील शिक्षिकेचा आणि तिच्या मुलाचा दुचाकीवरून जाताना झालेल्या अपघातात मृत्यू झाला. कविता कृष्णकांत चौधरी (वय ३५) आणि मुलगा लावण्य चौधरी (वय १०) अशी मृतांची नावे आहेत.
कविता या बर्डी (जळू) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत होत्या. शाळेत जाताना त्या नेहमी मुलाला सोबत घेऊन जातात. आज गुरुवारी त्या सकाळी मुलाला घेऊन दुचाकीवरुन शाळेत जात असताना, एरंडोलजवळच त्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात शिक्षिका व त्यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच एरंडोलचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार देवरे आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. नागरिकांच्या मदतीने मृतदेह जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले होते. दरम्यान ट्रक चालकाविरोधात एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






