नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि. कुबेर जाधव) – मागील महिन्यात कांद्याच्या वाढलेल्या दराने यूटर्न घेत मागील आठवड्यापासून बाजारभावात मोठी घसरण झाल्याने शेतकर्यांचे आर्थिक बजेट कोलमडू लागले आहे.
देशांतर्गत व स्थानिक बाजारपेठेत कांद्याची आवक वाढल्याने कांद्याच्या बाजारभावात तब्बल 2 हजार रुपयांची घसरण झाली आहे. दहा दिवसांपूर्वी कांद्याचे दर प्रतिक्विंटल 3 हजार रुपयांच्या पुढे होते. कांद्याची आवक कमी होऊन मागणी वाढल्याने दरात तेजी आली होती. हे चित्र सध्या बदलले असून देशांतर्गत गुजरात, आंध्रप्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश येथे स्थानिक कांदा विक्रीसाठी येऊ लागला आहे. त्याचा परिणाम पिंपळगाव बाजार समितीत दरात मोठी पडझड होऊ लागली आहे.
शनिवार दि.6 रोजी लाल कांद्याची 25 हजार क्विंटल आवक होऊन दर किमान 1451 रु., कमाल 2052 रु. तर सरासरी 1801 रु. एवढे राहिले. तर गावठी कांद्याच्या आवकेत घट होऊन 4 हजार रु. क्विंटल कांदा विक्रीसाठी आला. त्याला किमान 1200 रु., कमाल 2490 रु. तर सरासरी 1751 रु. दर मिळाला. गेल्या दोन महिन्यांतील हा नीचांकी दर आहे.
पंधरा दिवसांच्या तुलनेत पिंपळगाव बाजार समितीत दर घसरणीमुळे एकाच दिवशी शेतकर्यांना तीन कोटी रुपयांची झळ बसली आहे. उन्हाळ कांदा काढणीचा हंगाम सुरू होत असून पुढील काही दिवसांत बाजार समित्यांमध्ये उन्हाळ कांद्याची विक्रमी आवक होऊन बाजारभाव आणखी खाली येण्याची शक्यता आहे.







