सुरगाणा (प्रतिनिधी) – भवाडा ता. सुरगाणा येथील ग्रुप ग्रामपंचायतमधील माजी सरपंच चिंतामण वाघमारे यांनी गाव विकासासाठी ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची माहिती अधिकारातून माहिती मागितली असता त्यांना झालेल्या मारहाणीची चौकशी करून संबंधितांना निलंबित करण्याची मागणी माजी सरपंच चिंतामण वाघमारे यांनी गटविकास अधिकारी भावसार व पोलीस निरीक्षक दिवानसिंग विसावे यांच्याकडे निवेदन दिले आहे.
चिंतामण वाघमारे यांनी निवेदनात म्हटले आहे की, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी झिरवाळ हे भवाडा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये चौकशीसाठी आले असता विद्यमान सरपंच काशिनाथ वाघमारे व ग्रामविकास अधिकारी ठाकरे, सदस्य युवराज लोखंडे, सिताराम पाडवी, रामदास थोराइत व नारायण महाले, एकनाथ वाघमारे, गुलाब वाघमारे, प्रभाकर वाघमारे, किसन वाघमारे, बाळू निपुंगे या सर्व लोकांनी एकत्र येऊन गैरव्यवहाराची माहिती मागितल्याचे कारण सांगून कार्यालयात बंद करून वाघमारे यांना ठार मारण्याची धमकी दिली.
वरील सर्व प्रकार पंचायत समितीचे विस्तार अधिकारी झिरवाळ यांच्या समोर झाला आहे. मला शिवीगाळ, मारहाण धक्काबुक्की केल्याची क्लिप माझ्याकडे आहे. त्या क्लिपद्वारे आपण तपास करून गटविकास अधिकार्यांकडे ग्रामविकास अधिकारी ठाकरे यांचे निलंबन करावे, त्यांच्यासह सरपंच व सदस्यांवर गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलिसांनी करावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान माजी सरपंच चिंतामण वाघमारे यांनी न्याय मिळेपर्यंत सुरगाणा पंचायत समिती समोर आमरण उपोषण करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. सरपंच काशिनाथ वाघमारे व ग्रामविकास अधिकारी ठाकरे यांच्यासह इतर आरोपींवर 504 व 506 प्रमाणे सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.






