अजमेर (राजस्थान) – जिल्ह्यात एका १३ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अजमेरच्या अलवर गेट पोलिसांनी ही कारवाई केली. आरोपीने मुलीसोबत सोशल मीडियावरून मैत्री केली. तिला मैत्रीच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला एका हॉटेलमध्ये नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. आरोपीची चौकशी केली जाणार आहे.
अलवर गेट पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका व्यक्तीने या प्रकरणी तक्रार दिली होती. त्यानुसार, त्याची १३ वर्षीय मुलगी शाळेत शिकते. शाळेच्या ऑनलाइन क्लाससाठी त्यांनी तिला मोबाइल घेऊन दिला होता. मोबाइलवर तिने सोशल नेटवर्किंग साइटवर अकाउंट उघडले. त्यानंतर काकरिया येथील महेंद्र नावाच्या तरुणाच्या ती संपर्कात आली. त्याने तिला मैत्रीच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर एका हॉटेलवर बोलावून तिथे अत्याचार केले.
तिच्यासोबत घडलेल्या या घटनेची माहिती तिने आपल्या पालकांना दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने आरोपीला पकडण्यासाठी छापे मारले. खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीला बस स्थानक परिसरातून अटक केली. आरोपीला कोर्टात हजर करण्यात येणार आहे.






