मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – करोना संकटामुळे स्थूल राज्य उत्पन्नात ८ टक्के घट होऊनही कृषी, पायाभूत सुविधांची कामे तसेच उद्योग व गुंतवणुकीला अधिक चालना देऊन महाराष्ट्र मोठी भरारी घेईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले यांनी व्यक्त केला आहे. आज सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात आरोग्य यंत्रणेला मजबूत करण्यासाठी केलेली तरतूद निश्चितच महाराष्ट्र सुदृढ करणारी ठरेल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सर्व क्षेत्रात घसरण होत असताना ११.७ टक्के इतकी विक्रमी वाढ नोंदवणाऱ्या कृषी क्षेत्राला अधिक बळकटी देण्यात येईल. हा अर्थसंकल्प पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देताना समाजातील सर्व घटकांना दिलासा देणारा आहे, असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. अर्थसंकल्पातील ठळक बाबींचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला.
आरोग्यसेवा, आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास, नवीन वैद्यकीय महाविद्यालये प्रत्येक जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड पश्चात समुपदेशन केंद्रे अशा अनेक निर्णयांद्वारे आरोग्य व्यवस्थेला सक्षम करण्याचे प्रयत्न अर्थसंकल्पातून झालेले दिसतात, असे मुख्यमंत्री म्हणाले. ज्या शेतीने राज्य अर्थव्यवस्थेला भक्कम आधार दिला त्या शेती क्षेत्रास आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारे अनेक निर्णय आजच्या अर्थसंकल्पात घेण्यात आले आहेत. यात ३ लाखापर्यंतचे पिककर्ज वेळेत फेडणाऱ्या शेतकऱ्याला शून्य टक्के व्याजदराची योजना ही अतिशय महत्त्वाची आहे.
आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला सक्षमीकरणाच्या अनेक योजना अर्थसंकल्पात जाहीर झाल्या आहेत. यात महिलेच्या नावे घर खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात २० टक्क्यांची कपात करणारी “राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजना” घोषित झाली आहे. यामुळे महिला खऱ्या अर्थाने गृहस्वामिनी होण्यास मदत होईल, असा विश्वास वाटत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेतून ग्रामीण महाराष्ट्रातील विद्यार्थिनींना मोफत बसची सुविधा उपलब्ध करून दिल्याने मुलींची शैक्षणिक गळती थांबण्यास मदत होईल असे मुख्यमंत्री म्हणाले. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी नव्याने सुरु करण्यात आलेली संत जनाबाई सामाजिक सुरक्षितता योजना, तेजस्विनी बस संख्येत वाढ, राज्य राखीव महिला पोलिसांची स्वतंत्र तुकडी यासारखे महत्त्वाचे निर्णयही आजच्या अर्थसंकल्पातून घेण्यात आले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.






