सरकार नव्हे दरोडेखोरांची टोळी; राकेश टिकैत यांची मध्यप्रदेशात टीका

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची सोमवारी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या लोकसभा मतदारसंघात सभा घेतली. श्योपूरच्या जैदा कृषी उत्पन्न बाजार समितीत ही शेतकऱ्यांची सभा घेण्यात आली. केंद्रात कोणतेही सरकार नाही. कंपन्या सरकार चालवत आहेत. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांनी कृषी कायदे आणले आहेत. ही दरोडेखोरांची टोळी आहे. त्यांच्यापासून स्वतःचा बचाव करावा लागेल आणि देशालाही वाचवावं लागेल, असं शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले.

आंदोलन करण्यासाठी शेतकऱ्यांना कुणाची परवानगी घ्यायची गरज नाही. पोलिसांचे बॅरिकेड्स तोडा. आज इथे बॅरिकेड्स तोडले तर उद्या दिल्लीतील तोडू शकाल. ज्यांना भीती वाटते त्यांनी येऊ नका. हे तर फक्त ३ कायदे आहेत. गप्प बसले तर आणखी ४० कायदे येतील. सरकार चर्चा करण्यापासून पळ काढत आहे, असा सवालही टिकैत यांनी केला.

राकेश टिकैत यांनी केंद्र सरकार आणि कृषी कायद्यांविरोधात हल्लाबोल केला. केंद्र सरकार स्वतः आगीत तेल टाकते आणि नामानिराळे होऊन जनतेनेच आग लावल्याचा दोषारोप करते. हे निवडणुका असेच जिंकत नाहीत, ते काहीही करतात. कुठल्या राजकीय पक्षाचे सरकार असते तर गोष्ट वेगळी होती. पण हे तर दरोडेखोर आहेत, असा आरोप टिकैत यांनी केला.

संयुक्त किसान मोर्चाने आयोजित केलेल्या शेतकरी सभेत मध्य प्रदेशातील श्योपूर, शिवपुरी, मुरैना, अशोक नगरसह राजस्थानमधील बारां, कोटा, सवाई माधोपूरसह सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमधील शेतकरीही आले होते. शेतकरी सभेमुळे पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. सभेच्या ठिकाणापासून ते शहरात ठिकठिकाणी ५०० ते ६०० पोलिस आणि अधिकारी तैनात होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here