सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज देणारा गजाआड

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) –अभिनेता सुशांत सिंह राजपूत याला ड्रग्जचा पुरवठा केल्याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने गोव्यातून हेमंत सहा ऊर्फ महाराज या पेडलरला अटक केली.

तो ड्रग्ज पेडलर अनुज केसवानी आणि रिगल महाकालच्या संपर्कात होता. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात एनसीबीने अनुज आणि रिगलला यापूर्वी अटक केली होती. एनसीबी मुंबई आणि गोवा युनिटने कारवाई करून मोठय़ा प्रमाणात ड्रग्ज जप्त केले आहे.

अभिनेता सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी एनसीबीने गेल्या वर्षी गुन्हा दाखल करून एकूण 33 जणांना अटक केली होती. त्यात अनुज केसवानी आणि रिगल महाकालचा समावेश आहे. त्या दोघांच्या चौकशीत हेमंतचे नाव समोर आले. त्यानंतर एनसीबी मुंबई आणि गोवा युनिटने पणजी येथे संयुक्त कारवाई करून हेमंतला ताब्यात घेतले.

त्याच्या घरातून एनसीबीने एलएसडी आणि 30 ग्रॅम चरस जप्त केले. ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने हेमंत विरोधात गुन्हा दाखल केला. हेमंत हा मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी असून तो पणजी येथे ड्रग्जचा धंदा करत असल्याचे एनसीबीचे म्हणणे आहे.

हेमंतच्या अटकेनंतर एनसीबी मुंबई आणि गोवा युनिटने गोव्याच्या माजलवाडो येथे संयुक्त कारवाई करून एलएसडी, कोकेन, गांजा आणि ब्लू क्रिस्टल जप्त केले आहे. ड्रग्जप्रकरणी एनसीबीने उगोचुकु उबाबुको आणि जॉन डेव्हिड या नायजेरियनला अटक केली. उबाबोकुला 2013 साली गोवा पोलिसांनी ड्रग्ज केसमध्ये अटक केली होती. त्याच्या चौकशीत पेडलर प्रसाद वालकेचे नाव समोर आले. त्यानंतर एनसीबीने प्रसादच्या मुसक्या आवळून त्याच्या घरातून काही ड्रग्ज जप्त केले. प्रसादला तीन वर्षांपूर्वी ड्रग्जप्रकरणी एनसीबी गोवा युनिटने अटक केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here