महाबळेश्वरमध्ये मुख्याध्यापकानेच केला विद्यार्थीनीवर बलात्कार; ‘चाइल्ड हेल्पलाइन’मुळे प्रकरण उघड

सातारा (प्रतिनिधी शरद मोरे) – अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या मुख्याध्यापकास महाबळेश्वर पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात उभे कले असता, जिल्हा व सत्र न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, पीडित मुलीच्या मैत्रिणीने दाखविलेल्या धाडसामुळेच बलात्कारी मुख्याध्यापक गजाआड झाल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

महाबळेश्वरातील एका नावाजलेल्या हायस्कूलमधील दिलीप रामचंद्र ढेबे या मुख्याध्यापकाने आपल्या पदाचा दबाव आणून दहावीत शिकत असलेल्या एका 15 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याचे प्रकरण काल उघडकीस आले होते. याप्रकरणी पोलिसांनी शोध घेऊन तत्काळ मुख्याध्यापकाच्या मुसक्या आवळल्या होत्या. पोलिसांनी त्याला जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, जिल्हा न्यायाधीशांनी त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुख्याध्यापक आपल्यावर वारंवार अत्याचार करीत असल्याची माहिती पीडित मुलीने आपल्या एका मैत्रिणीला दिली होती. त्याच हायस्कूलमध्ये 22 फेब्रुवारी रोजी लैंगिक अत्याचारावर महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अब्दुल हादी बिद्री यांनी मुलींना मार्गदर्शन केले होते. यावेळी ‘चाइल्ड हेल्पलाइन’चा ‘1098’ हा क्रमांक पोलिसांनी मुलींना दिला होता. तसेच हा नंबर शाळेच्या फलकावरदेखील लावला होता. पीडित मुलीच्या एका मैत्रिणीने या हेल्पलाइन क्रमांकावर फोन करून आपल्या मैत्रिणीवर अत्याचार होत असल्याची माहिती दिली होती. या अत्याचाराची गंभीर दखल घेत महाबळेश्वर पोलिसांनी गेले पाच दिवस तपास करून पीडित मुलीचा शोध घेतला. तिला विश्वासात घेऊन अत्याचाराचे प्रकरण उघडकीस आणले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here