जम्मू-कश्मीर – भांडण झाल्यावर बायको माहेरी निघून गेली याचा राग आल्याने नवऱ्याने सासरी जाऊन सासरच्या मंडळींवर गोळीबार केला. नवरा-बायकोच्या भांडणात कुटुंबातील तीन कर्त्या व्यक्तींची हत्या झाल्याची घटना जम्मू-कश्मीरमध्ये घडली आहे.
जम्मू जिल्ह्यातील सतवारी परिसरात राहणारा पोलीस कर्मचारी राजेंद्र कुमार उर्फ रवि याचे आणि त्याची पत्नी सीमा देवी या दोघांमध्ये सतत भांडणं होत असत. या भांडणांना कंटाळून त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. यामुळे रागाने संतप्त झालेला राजेंद्र कुमार मंगळवारी रात्री फलामंडल गावातील अलोरा येथे त्याच्या सासरवाडीला आला. तेथे आल्यावर घरात शिरताच त्याने पत्नीचे आई-वडील आणि पत्नीवर सर्व्हीस रायफलने अंधाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली. एकाएकी अचानक हल्ला झाल्यामुळे घरातील सर्व सदस्य प्रचंड घाबरले. तरीही कोणाच्याही जीवाची पर्वा न करता कुटुंबातील सर्वच सदस्यांवर राजेंद्र कुमार गोळ्या झाडत होता.
राजेंद्र कुमारने केलेल्या या अंधाधुंद गोळीबारात त्याची सासू राजकुमारी हिचा मृत्यू झाला. तसेच त्याची पत्नी सीमादेवी आणि सासरे रमेश कुमार हे गंभीर जखमी झाले होते. यावेळी त्याने त्याचे दोन भाचे आणि काका यांच्यावरही रायफलने गोळीबार केला. त्यामुळे घाबरून ते दोघेही घरातील एका खोलीत लपून बसले होते. म्हणून त्याने त्यांच्यावर तो खिडकीतून गोळ्या झाडू लागला. त्यानंतर तो त्याच्या गाडीतून पळून गेला.






