मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – नौदलासाठी स्कॉर्पिन प्रकारची तिसरी पाणबुडी आयएनएस करंज मुंबईच्या नौदल गोदीत झालेल्या औपचारिक कार्यक्रमात नौदलाच्या सेवेत दाखल झाली. 1971 च्या हिंदुस्थान- पाकिस्तान युद्धादरम्यान कमांडिंग ऑफिसर असलेले, माजी नौदलप्रमुख अॅडमिरल व्ही.एस.शेखावत , परमविशिष्ट सेवापदक, अतिविशिष्ट सेवापदक, वीरचक्र, (निवृत्त) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
फ्रान्सच्या मे.नेव्हल ग्रुप या कंपनीच्या संयुक्त सहभागाने माझगाव डॉक शिपबिल्डर्स (मर्या.) या मुंबईतील कंपनीतर्फे स्कॉर्पिन श्रेणीतील एकूण सहा पाणबुड्यांची निर्मिती केली जात आहे. आय.एन.एस. करंज ही पाणबुडी पश्चिमी नौदल कमांड ताफ्याचा भाग असेल आणि कमांडच्या शस्त्रास्त्रांचा आणखी एक अत्यंत शक्तिशाली विभाग म्हणून काम करेल.
नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग तसेच नौदल आणि संरक्षण मंत्रालयाचे अनेक वरिष्ठ अधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर या समारंभाला उपस्थित होते. यापूर्वीची करंज ही रशियन बनावटीची फॉक्सट्रॉट प्रकारची पाणबुडी 2003 साली सेवेतून निवृत्त करण्यात आली होती. त्या पाणबुडीचा सर्व कर्मचारीवर्ग या समारंभाला विशेष आमंत्रित म्हणून यावेळी उपस्थित होता. स्वदेशीकरण आणि आत्मनिर्भरता ही नौदलाच्या विकासाची आणि भविष्यकालीन कार्यशक्तीची मुलभूत तत्वे आहेत असे नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग यांनी त्यांच्या भाषणात सांगितले.






