देशात बलात्कार, दंगलीचे प्रमाण घटल्याची गृह मंत्रालयाची संसदेत माहिती

नवी दिल्ली – देशात बलात्कार आणि सांप्रदायिक हिंसाचार आणि दंगलीचे प्रमाण घटल्याचे गृह मंत्रालयाकडून बुधवारी संसदेत सांगण्यात आले. सरकार गुन्ह्यांच्या नोंदणीच्या डिजिटल प्रक्रियेवर भर देत आहे. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत लिखीत उत्तरात ही माहिती दिली. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये दंगलीच्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. विविध राज्य केंद्रशासित प्रदेशात पोलिसांनी 2019 या वर्षात 440 गुन्ह्यांची नोंद केली आहे. हीच संख्या 2018 मध्ये 512 एवढी होती.

बलात्कार, हत्या आणि अपहरणाच्या घटनांमध्येही घट झाल्याचे गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आले. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या आकडेवारीवरून 2019 मध्ये देशात बलात्काराचे 32,033 आणि हत्येचे 28,918 तर अपहरणाच्या 1,05,037 गुन्हे दाखल झाले होते. तर 2018 मध्ये ही संख्या जास्त होती. 2018 मध्ये बलात्काराचे 33,356 हत्येचे 29,017 आणि अपहरणाचे 1,05,734 गुन्हे नोंदले गेले होते.

गुन्ह्यांच्या नोंदणीसाठी डिजिटलायझेवर जोर देण्यात येत असल्याचेही गृह मंत्रालयाकडून सांगण्यात आले. क्राईम अॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अॅण्ड सिस्टीमवर आतापर्यंत एकूण 30.81 कोटी गुन्हे दाखल आहेत. 2018 ते 2020 या काळात 116 पाकिस्तानी, 2,812 बांग्लादेशी आणि 325 म्यानमारच्या घुसखोरांना ताब्यात घेण्यात आल्याचेही गृह मंत्रालयाने सांगितले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here