नवी दिल्ली (वृत्तसंस्था) । राजधानी दिल्ली पुन्हा एकदा ‘निर्भया’ सारख्या प्रकरणानं हादरली आहे. एका अकरावीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी या घटनेप्रकरणी बस चालक आणि वाहकाला अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना 4 ऑगस्ट रोजी घडली. जेव्हा कुटुंबीयांवर नाराज होऊन संबंधित विद्यार्थिनी आपल्या चुलत बहिणीच्या घरी जाण्यासाठी बसमध्ये चढली. मात्र, मुसळधार पाऊस आणि अंधारामुळं ती चुकून परी चौकात उतरली. तिथून पुढं जाण्यासाठी तिनं एका स्लीपर बसला हात करून बस थांबली.
दरम्यान, बस चालकानं विद्यार्थिनीला सांगितलं की, नोएडा सेक्टर-63 ला जाणारी स्लीपर बस आहे आणि ती बसमध्ये चढली. बसमध्ये चढल्यानंतर पीडितेला लक्षात आलं की, आतमध्ये एकही प्रवासी नव्हता. दरम्यान, बस सुरू होताच कंडक्टरनं मुलीशी छेडछाड सुरू केली. त्यानंतर चालक आणि कंडक्टर या दोघांनी मिळून धावत्या बसमध्ये विद्यार्थिनींवर सामूहिक बलात्कार केला आणि कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. तसंच या घटनेनंतर आरोपींनी तिला मध्यरात्री काश्मिरी गेट बस स्थानकाजवळील रिंग रोडवर उतरवलं आणि तिथून पळ काढला.
या घटनेनंतर घाबरलेल्या विद्यार्थिनींनं काश्मिरी गेट पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपींचा शोध घेण्यासाठी त्यांनी विविध स्तरांवरून माहिती गोळा केली आणि मोठ्या संख्येनं असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासले. तपासादरम्यान पोलिसांना आढळून आलं की, घटनेनंतर दोन्ही आरोपी तिमारपूर परिसरातील एका बस पार्किंग लॉटमध्ये उपस्थित होते. पोलीस पथकानं कारवाई करत चालक कुलदीप आणि वाहक संदीप यांना अटक केली. तसंच घटनेत वापरलेली बसही जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांच्या तपासात असं समोर आलं की, घटनेच्या दिवशी बसमध्ये बिघाड झाला होता. चालक आणि वाहकाने दुरुस्तीसाठी बस सूरजपूर येथील एका वर्कशॉपमध्ये नेली. दुरुस्ती पूर्ण झाल्यावर, ते दोघे रिकामी बस तिमारपूरच्या दिशेने नेत होते. परी चौकात विद्यार्थिनीनं बस थांबण्यासाठी हात केला. पोलिसांच्या माहितीनुसार, बसनं परी चौकापासून काश्मिरी गेटपर्यंत अंदाजे 47 किलोमीटरचा प्रवास केला. स्लीपर बसमधील पडद्यांमुळं आतील हालचाली दिसू शकल्या नाहीत. परिणामी, येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना या कथित घटनेची माहिती मिळाली नाही. पोलीस दोन्ही आरोपींची चौकशी करत आहेत. बसची फॉरेन्सिक तपासणी सुरू असून, इतर उपलब्ध पुरावे गोळा करण्याचे कामही सुरू आहे. दरम्यान, कायद्यानुसार अल्पवयीन पीडितेची ओळख उघड करण्यात आलेली नाही.







