सोमालियाजवळ समुद्री चाच्यांनी अपहरण केलेल्या दोन जहाजांवरील २२ भारतीय सुरक्षित

सोमालिया

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येमन आणि सोमालियाच्या किनारपट्टीजवळ घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये समुद्री चाच्यांनी दोन व्यापारी जहाजांचे अपहरण केल्याची घटना समोर आली आहे. या जहाजांवर एकूण ३० कर्मचारी असून, त्यापैकी २२ जण भारतीय नागरिक आहेत, अशी माहिती जहाजबांधणी मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं शुक्रवारी (२१ ऑगस्ट) दिली. दरम्यान, या घटनेची माहिती देताना संबंधित अधिकाऱ्यानं पीटीआय या वृत्त संस्थेला सांगितलं की, सर्व भारतीय कर्मचारी सुरक्षित आहेत.

येमनच्या किनाऱ्यापासून सुमारे ३० नॉटिकल मैल अंतरावर अदनच्या आखातात एरिट्रियाचा ध्वज असलेल्या ‘एमटी सिबू १’ या तेल उत्पादने वाहून नेणाऱ्या टँकरचे २० ऑगस्टला सशस्त्र चाच्यांनी अपहरण केले. या जहाजावर १६ भारतीय, तसंच सीरिया, सुदान आणि इराकचे प्रत्येकी एक नागरिक आणि एका नागरिकाचं राष्ट्रीयत्व अद्याप निश्चित झालेले नाही, असे एकूण २० जण होते, अशी माहिती अधिकाऱ्यानं दिली.
“रिक्रूटमेंट अँड प्लेसमेंट सर्व्हिस लायसन्स एजन्सी – एस के एस कृषी मरीन सर्व्हिस (ओपीसी) प्रायव्हेट लिमिटेडनं दिलेल्या माहितीनुसार, सध्या जहाजावर सहा सशस्त्र समुद्री चाचे (पायरेट्स) आहेत आणि त्यांनी जहाजाचा ताबा घेतला आहे,” असंही त्यांनी सांगितलं. पुढं त्यांनी सांगितलं की, आरपीएसएलला घटनेचा अहवाल आणि त्यानंतरचे नियतकालिक अद्ययावत तपशील तपासणी आणि नोंदीसाठी ई-नाविक ऑनलाइन सागरी अपघात अहवाल प्रणालीद्वारे सादर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here