न्यूयॉर्क (वृत्तसंस्था) । शहरातल्या प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअर परिसरात एका महिने दोन जणांवर चाकूने हल्ला केला. न्यू यॉर्क शहर पोलीस विभागाने (NYPD) दिलेल्या माहितीनुसार, अचानक झालेल्या या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ती हल्लेखोर महिलाही ठार झाली.
सोमवारी झालेला हा गोळीबार न्यू यॉर्क पोलीस विभागाच्या एका कार्यालयाजवळ, ‘वन टाइम्स स्क्वेअर’ इमारतीबाहेर घडला. याच भागात दरवर्षी न्यू इयरच्या सेलिब्रेशनमध्ये ‘बॉल ड्रॉप’चा कार्यक्रम होतो. हा संपूर्ण न्यू यॉर्कमधला पर्यटकांची सर्वाधिक वर्दळ असलेला आणि पोलिसांचा कडक पहारा असलेला भाग आहे.
सोमवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलिसांनी सांगितले की, क्वीन्स भागात राहणाऱ्या या ४९ वर्षीय महिलेने एका शॉपिंग बॅगेतून दोन चाकू काढले आणि एका ६८ वर्षांच्या पुरुषाच्या पोटावर वार केले. त्यानंतर लगेचच तिने वळून एका ३२ वर्षांच्या महिलेच्या पोटातही चाकू भोसकला.
या दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, त्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तो पुरुष सध्या धोक्याबाहेर असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
हे पीडित लोक शहरात आलेले पर्यटक होते की अमेरिकेचे रहिवासी, याबाबत पोलिसांनी कोणतीही माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.







