वॉशिंग्टन (वृत्तसंस्था) । अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्डने अमेरिकेच्या दोन नौदल युद्धनौकांना लक्ष्य करत क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा अमेरिकेच्या लष्कराने केला आहे. त्यानंतर अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने तीन इराणी तेलवाहू जहाजांवर हल्ला केला. या कारवाईमुळे आखातातील तणाव पुन्हा शिगेला पोहोचला आहे.
अमेरिकेच्या म्हणण्यानुसार, इराणने प्रादेशिक समुद्रात गस्त घालणाऱ्या अमेरिकेच्या एका विमानवाहू युद्धनौकेसह एका गाइडेड-मिसाइल डिस्ट्रॉयरवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. अमेरिकेच्या दोन्ही युद्धनौकांनी हे हल्ले चुकवले असून कोणत्याही अमेरिकन जवानाला दुखापत झालेली नाही. या हल्ल्यानंतर अमेरिकेने तातडीने प्रत्युत्तर देत इराणच्या तेलवाहतूक व्यवस्थेला लक्ष्य केले.
अमेरिकेच्या वृत्तसंस्थेने तीन इराणी क्रूड ऑइल कॅरिअर्सवर कारवाई केल्याचे जाहीर केले आहे. त्यापैकी दोन जहाजे कायमस्वरूपी निष्क्रिय करण्यात आली, तर एक रिकामे तेलवाहू जहाज पूर्णपणे नष्ट करण्यात आले. ही जहाजे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड आणि त्यांच्याशी संबंधित सशस्त्र गटांना आर्थिक मदत करणाऱ्या कथित ‘शॅडो फ्लीट’चा भाग असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.







