शहादा (प्रतिनिधी विजय निकम) – नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील शिरुड त. स. उमरटी शिवारात जवळपास सात एकर अफूची शेती आढळून आली आहे . म्हसावद पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या शिवारात अफूची लागवड करण्यात आल्याची गुप्त माहिती पोलीस विभागाला मिळाली त्यानंतर घटनास्थळी पोलीस पोहोचले असता अफूची एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलेली लागवड बघून पोलीसदेखील अचंबित झाले. पोलीस व महसूल विभागाकडून चार दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर अफूची कापणी करून मोजमाप करण्यात आले. या शेतीतून तब्बल 90 क्विंटल अफू हस्तगत करण्यात आली असून त्याचा बाजारभाव 45 लाख 27 हजार इतका आहे. या कारवाईकडे महाराष्ट्रातील अवैध अफू शेतीची सगळ्यात मोठी कारवाई म्हणून बघितले जात आहे.
उमरटी शिवारातील गट नंबर 28/1, 28/2, 28/3 या सातबाऱ्यावरील क्षेत्रात तीन महिन्या अगोदर अफूची लागवड करण्यात आली होती. शेतीचे मुळ मालक याबाबत अनभिज्ञ असल्याचे समजते. सदर शेती कसण्यासाठी करले -परसुळे या.साक्री येथील मेंढपाळांना एकरी वीस हजार रुपये नफ्याने दिली होती परंतु त्यांनी या क्षेत्रात मक्यासोबत आंतरपिक म्हणून अफूची लागवड केली. शेतकऱ्यास मसाल्याच्या पिकांची शेती करणार असून खसखस लागवड करणार असल्याचे सांगितले होते परंतु अफिम लागवडीतून कोटय़वधी रुपये कमविण्याच्या प्रलोभनामुळे मेंढपाळांनी अफूची लागवड केली. अनेक वर्षापासून त्यांचा हा व्यवसाय सुरू असावा असा कयास परिसरातून व्यक्त होत आहे.
याबाबत माहिती मिळतास अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक विजय पवार यांनी अफिम शेतीची पाहणी करून पुढील तपासाचे आदेश दिले होते परंतु अद्याप अवैध अफु शेती करणारा मास्टरमाईंड शोधण्यात पोलीस प्रशासन असमर्थ ठरले आहे. शेत मालकासह इतर दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असले तरी मुख्य मास्टरमाइंडचा तपास संथगतीने सुरू आहे..
या प्रकरणी म्हसावद पोलिसांनी शेतमालक अवलसिंग नवलसिंग भिल व रहमसिंग जालमसिंग भील या दोघांना मानवी व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियमाचे कलमनुसार अटक केली आहे. अफूची शेती करण्यासाठी अनुभव असणे आवश्यक आहे. त्यामुळे पूर्ण माहिती असल्याशिवाय अफूची शेती करणे शक्य नाही. या मेंढपाळांना अफूच्या शेती करण्याविषयी मार्गदर्शन साक्री तालुक्यातील दुसाने बरसाने येथून मिळाले असल्याचे कळते. आदिवासी बांधवांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अशाच प्रकारे अजून काही ठिकाणी अफूची शेती होत असावी तरी यामुळे शेतकरी विनाकारण अडचणीत सापडत आहेत . तरी या अफू शेती मागील मास्टरमाइंड व त्याचे रॅकेट त्वरित उघडकीस आले पाहिजे नाहीतर यापुढे अतिदुर्गम भागात असलेल्या शेतकऱ्यांना प्रलोभने देऊन अशाच प्रकारची शेती केली जाऊ शकते व नाहक एखाद्या शेतकऱ्याचा यात बळी जाऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहून कारवाई करणे अपेक्षित आहे.






