पुणे (पंढरी गायकवाड) – सद्यस्थितीत बेड शिल्लक नाहीत, ही कृत्रिम समस्या निर्माण केली आहे. काही विशिष्ट आडनावाच्या लोकांना एडमिट करून घेतले जात नाही. श्रीमंत वाटणाऱ्या – श्रीमंत दिसणाऱ्या लोकांनाच बेड मिळतात, असा गंभीर आरोप रूग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर करोनाच्या सोबतच हृदयाविकार, पक्षघात, डायलिसिसमुळे उद्भवणारी गंभीर परिस्थितीमूळे पुण्याच्या सर्वच भागातून दररोज शेकडो नागरिक मिळेल त्या वाहनाने प्रत्येक हॉस्पिटलला रुग्णास ऍडमिट करण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र प्रत्येक हॉस्पिटलमध्ये नकार पचवावा लागतो. यातील काहींना रस्त्यात मृत्यु आल्याचे “सत्य” सामान्य माणसाला किंमत नसल्याचे अधोरेखित करते.
रुग्णाचे नाव, आडनाव, गरीब असल्याचा पेहराव पाहून याच्याकडून रोख रक्कम मिळणार नाही, अशी खूणगाठ ठरवून श्रीमंत वाटणाऱ्या, दिसणाऱ्या नागरिकांना ऍडमिट करण्यावर हॉस्पिटल चालकांनी भर दिल्याचे दिसून आले आहे.
पालिका आणि राज्यसरकरला हॉस्पिटल जुमानत नाहीत. “पैसे नसतील तर मरायला तयार राहा,” अशी व्यवस्था निर्माण करणाऱ्या हॉस्पिटल चालकांचा परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी निषेध केला आहे.







