पत्नी कामावर जाताच बाप करायचा दोन मुलींवर बलात्कार; आरोपीला अटक

गुना (मध्यप्रदेश) – वडील नेहमी आपल्या मुलांचं इतरांपासून रक्षण करण्यासाठी आयुष्यभर झगडत असतात. मात्र, गुनामधील या घटनेनं वडील अन् मुलीच्या पवित्र नात्यालाच काळिमा फासला आहे. या बापानं माणुसकीच्या सर्व हद्दी पार करत स्वतःच्याच दोन मुलींवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. हे प्रकरण म्याना ठाण्याच्या क्षेत्रातील नकटीदेवी गावातील आहे.

या घटनेनंतर दोघीही बहिणी आपल्या आईसोबत पोलीस ठाण्यात गेल्या आणि बापाविरोधात तक्रार दाखल केली. आपल्या पत्नीच्या अनुपस्थितीत हा व्यक्ती आपल्या मुलींवर बलात्कार करायचा. आरोपीला दारु पिण्याचं व्यसन लागलं होतं आणि मुलींवर लैंगिक अत्याचाराचं हे सत्र अनेक दिवसांपासून सुरू होतं. पत्नी शेतात कामाला जाताना आरोपी दोन्हीतील एक मुलीला आपल्या जवळच ठेवून हे घाणेरडं कृत्य करायचा.

या भयंकर घटनेचा जेव्हा खुलासा झाला तेव्हा गावात पंचायत बोलावून हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला गेला. आदिवासींच्या या पंचायतीमध्ये आरोपीला माफ केलं गेलं. मात्र, यानंतरही जेव्हा पुन्हा एकदा मुलींवर लैंगिक अत्याचार करण्यात आले तेव्हा आई आपल्या दोन्ही मुलींना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली आणि तक्रार दाखल केली. पोलीस अधीक्षक राजीव कुमार मिश्रा यांनी या घटनेबाबत हळहळ व्यक्त केली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून तो गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याच मुलींवर बलात्कार करत होता, असंही त्यांनी सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here