परभणी (प्रतिनिधी) – जिल्हा रुग्णालयाच्यावतीने कोरोनाबधितांसाठी तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र कोरोना हॉस्पिटलमधून जालना आणि औरंगाबाद येथील दोन रूग्ण पळून गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना कळवले असून पोलीस त्या रुग्णांचा शोध घेत आहेत. कोतवाली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी या प्रकरणाची माहिती दिली
परभणी शहरातील आयटीआयच्या इमारतीत कार्यान्वित केलेल्या कोविड सेंटरमधून कोरोनाचे हे दोन संशयित रूग्ण गुरुवारी रात्री पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. कोविड सेंटरमधून रूग्ण पळल्याने पोलीस आणि रुग्णालय प्रशासन प्रचंड गोंधळात आहेत.
या कक्षात गुरुवारी जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यातील दोन नवीन व्यक्तींची नोंदणी झाली होती. या संशयितांना संसर्गजन्य कक्षात ठेवण्यात आले होते. मात्र, त्या दोघांनी कोणाला काहीही न सांगता रुग्णालयातून पलायन केले. ही बाब रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात येताच या प्रकरणाची तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पळून गेलेल्या रुग्णांचा रेल्वे स्थानक व बस स्थानक परिसरात तसेच अन्य ठिकाणी शोध घेण्यात आला. परंतु ते सापडले नाहीत.
दरम्यान, डॉक्टरांमार्फत त्या रूग्णांच्या नातेवाईकांना संपर्क केला असून, त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांनी दिली.






