ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोनाच्या वाढत्या प्रदूर्भावानंतर महापालिका, पोलीस यंत्रणेने सर्वच आस्थापना चालकांवर कोरोना नियमाचे कठोर निर्बंध 11 मार्चपासून लादले आहेत. त्यातच कल्याण-शीळ मार्गावरील ‘इगो’ नावाच्या ऑर्केस्टाबार मालकाने रात्री उशिरापर्यंत बारमधील नृत्य सुरू ठेवल्याचे एका व्हिडिओवरून समोर आल्याने अखेर पोलिसांनी या बारच्या मालकावर विविध कलमानुसार शनिवारी (दि. 13 मार्च) दुपारच्या सुमारास मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
ऑर्केस्ट्राच्या नावाने सुरू असलेला हा धांगडधिंगा रात्री 11 वाजल्यातनंतरही सुरूच असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने पोलीस व पालिका प्रशासनाने लादलेल्या कोरोना नियमाला या लेडीज बारवाल्यानी पायदळी तुडवल्याची चर्चा शहरात सुरू झाली. तर दुसरीकडे हाच व्हिडिओ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मोबाईलमध्ये दिसताच त्यांनी चौकशी करून अशोक पुरषोत्तम पंडा या बारमालकावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
कल्याण-शीळ मार्गावर मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत किमान 25 ऑर्केस्टा बार असतील. या बारमध्ये उशीरापर्यंत बारबालांची छमछम सुरू असल्याचे अनेकदा पोलिसांनी टाकलेल्या धाडी दरम्यान उघडकीस आले आहे. कोरोनाच्या काळातही डोंबिवली पुर्वेकडील कल्याण-शीळ मार्गावरील ‘इगो’ नावाच्या ऑर्केस्टाबारमधील हा व्हिडिओ असल्याचे समोर येताच स्थानिक पोलिसांची धावपळ उडाली होती. विशेष म्हणजे केवळ हा बार नाही तर, या मार्गावरील इतर बार रेस्टॉरंट देखील बिनदिक्कत सुरू असून कोरोनाचे निर्बंध केवळ सर्वसामान्य दुकानदारांनाच का, असा सवाल या व्हिडिओमूळे उपस्थित झाल्याने कल्याण डोंबिवलीत कोरोनाला आळा बसेल की, कोरोनाचा प्रादुभाव आणखी वाढेल, असा सवालही कोरोनाच्या निर्बंधात अडकलेल्या व्यापाऱ्यांनी उपस्थित केला.






