औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) – जिल्ह्यातील बोकुड जळगाव या गावातून हाणामारीचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोन गट आपापसात भिडले आहेत. या भांडणातील दोन्ही गटांनी एकमेकांवर विटांनी मारहाण केली आहे. या वादात अनेक तरुण, महिला आणि लहान मुलं देखील होती. भांडणांत सहभागी झालेल्या लोकांनी दगड, काठ्या आणि विटांच्या साह्याने अनेकांना जखमी केलं आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाचं व्हायरल होतं आहे. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित घटना औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बोकुड जळगाव या गावातील आहे. येथील दोन गटांत ही तुंबळ हाणामारी झाली आहे. दोन्ही गटातील लोकांनी एकमेकांवर विटांनी तुफान मारहाण केली. या शिवाय त्यांनी लाठ्या काठ्यांचा वापर करून एकमेकांना जखमी केलं आहे. बोकुड जळगाव येथील एका जमीनीच्या तुकड्यावरून या वादाला सुरुवात झाल्याची माहिती मिळाली आहे. बातचीत सुरू असताना अचानक या दोन गटांत जुंपली आहे.
या हाणामारीत 2 जण गंभीर दुखापत झाली आहे. तर अनेक जणांना छोट्या मोठ्या दुखापती झाल्या आहेत. या सर्व जखमींवर औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी परस्पर विरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाचा अधिक तपास बिडकीन पोलीस करीत आहे. या जीवघेण्या हाणामारीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.






