“लॉकडाऊनच्या काळात वृक्षारोपण, पर्यावरण असमतोलावर उपाय’ असा संदेश”

मुंबई (प्राजक्ता अरूण चव्हाण) – आपल्या भारताची लोकसंख्या जसजशी वाढत आहे. तसतशी झाडेसुद्धा कमी होत आहेत. त्याचा परिणाम पर्यावरणावर होत असल्याचे आपण बघतो आहे. जळणासाठी आणि घरे बांधण्यासाठी बेसुमार वृक्षतोड केली गेली त्यामुळे उष्णता वाढली. पावसाचे प्रमाण कमी झाले. जमिनीची धूप होऊन ती नापीक झाली. दुष्काळाचे प्रमाण वाढले. परिणामी हवेच्या प्रदुषणासारख्या समस्यांना मानवाला तोंड द्यावे लागत आहे. म्हणून ‘झाडे लावा, झाडे जगवा’ ही संकल्पना राबविली जात आहे. व प्रत्येक वर्षी त्याप्रमाणे वृक्षारोपण पण केलं जातं व वृक्षलागवडीची वृक्षांची संख्या सरकारी आकडेवारीनुसार लाखोंवर सांगितली जाते, पण जी लाखो झाडे लावली जातात, त्याच्यातली जगतात किती? किंवा जगविण्याचे प्रयत्न किती केले जातात, याचा विचार व्हायला हवा! फक्त वृक्षारोपण करून चालणार नाही, तर त्यांच संवर्धनसुद्धा करणं, ही काळाची गरज आहे. हे ओळखून चिपळून तालुक्यातील मुर्तवडे कातळवाडी या गावातील युवकांनी प्रेरणादायी असा उपक्रम लॉकडाऊन काळातही यशस्वी केला.
जगावर असणारे कोरोनाचे संकट आणि या विषाणूचा दिवसेंदिवस वाढत जाणारा प्रादुर्भाव यातूनच या काळात आज सर्वत्रच  विविध उपक्रम राबवले जात आहेत. अशीच एक नवी संकल्पना कातळवाडीतील युवकांनी अंमलात आणली. “झाडे लावा – झाडे जगवा” आणि या विज्ञान युगात वृक्ष लागवड काळाची गरज आहे. याचे महत्व समजून व कोरोना संबंधी घातल्या गेलेल्या निर्बंधाची काळजी घेऊन कातळवाडीतील युवा समाजसेवक बबनशेठ नेवरेकर यांच्या मार्गदर्शनपर विचारांतून रविवार, दिनांक १९ जुलै २०२० रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. गावचे ग्रामदैवत – वाघजाई देवी मंदिर परिसर, जि. प. पूर्ण प्रा. शाळा मुर्तवडे नं – २ (कातळवाडी) व रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात आली. वृक्षारोपण हाच पर्यावरण असमतोलावर उपाय. झाडे लावा, झाडे जगवा. आज तुम्ही झाडांना जगवा. भविष्यकाळात हीच झाडे तुम्हाला वाचवतील असा संदेश महाराष्ट्र हरित सेना, वन विभाग महाराष्ट्र शासनचे सदस्य युवा पत्रकार दिपक कारकर तसेच समाजसेवक बबनशेठ नेवरेकर यांनी यानिमित्ताने दिला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी कातळवाडीतील वरिष्ठ मंडळी ते तरुण युवकांनी प्रचंड मेहनत घेतली. या स्तुत्य उपक्रमाचे कातळवाडी ग्रामीण – मुंबई मंडळातर्फे व विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here