रफटफ चेहरा, सहज अभिनय, काटेकोर शरीर लाभलेला अभिनेता इम्तियाज खान

    योगेश शुक्ल, ९६५७७०१७९२

    अभिनेता जयंत यांचा ज्येष्ठ चिरंजीव व ‘गब्बर’ अमजद खान यांचा ज्येष्ठ बंधू यासह मोजक्याच चित्रपटात रंगविलेला पण लक्षणीय अभिनयाने लक्षात राहणारा खलनायक, हिंदी – गुजराथी रंगभूमीवरील दिग्दर्शक, गुजराथी दूरचित्रमालिकांचा दिग्दर्शक अशी बहुआयामी व्यक्तिमत्वाचे रफटफ चेहरा, सहज अभिनय, काटेकोर शरीर लाभलेले इम्तियाज खान. आज यांचा स्मृतिदिन.

    इम्तियाज यांचे आजोबा सैद अहमद खान मुळतः पेशावर येथील पठाण होते. अलवर संस्थानाच्या महाराजा जयसिंह यांचे ए.डी.सी. होते. त्यांची दोन मुले जहांगीर व जकरिया खान हे देखील वडीलांप्रमाणे शाही खानदानाच्या सेवेत वरिष्ठ पदांवर होते. जहांगीर खान अलवर संस्थानाचे पोलीस सुपरिटेन्डेंट तर जकरिया खान शाही घोडदळाचे सेकंड लेफ्टनंट होते. 1930 च्या सुरुवातीला अलवर संस्थांनामध्ये चित्रपट दाखविण्यास सुरुवात झाली. हे माध्यम पाहताच या दोन्ही भावांच्या मनात चित्रपटाविषयी एवढे आकर्षण निर्माण झाले की, त्यांनी आपल्या नोकर्‍या सोडून चित्रपटात काम करण्यासाठी स्वप्ननगरी मुंबई गाठली.

    पण दुदैवाने मुंबईला आल्यानंतर काहीच काळात जहांगीर खान यांचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू ओढवला. पण तोपर्यंत जकरिया खान यांचे नशीब खुलले होते. निर्माता शंकरभाई भट्ट आणि विजय भट्ट यांच्या प्रकाश पिक्‍चर्सच्या चित्रपटात त्यांना जयंत या नामानिधानासह अभिनयाची संधी मिळून ते स्टार झाले होते. काही काळाने चरित्र अभिनेता म्हणूनदेखील ते लोकप्रिय ठरले. 1970 च्या दशकात जयंत यांची मुले त्यांच्याच पदचिन्हावर चालत अभिनयाकडे वळले. छोटा मुलगा अमजद खान 1975 मध्ये आलेल्या शोले या पहिल्याच चित्रपटाने खलनायक म्हणून चित्रपटसृष्टीत स्थिरावला पण त्याच्याआधी 1972 मध्ये आलेल्या दो गज जमीन के निचे या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेने इम्तियाज यांचाही संघर्ष सुरु झाला होता. मुळात इम्तियाज यांना दिग्दर्शनात रस होता मुंबईत आधी हिंदी रंगभूमीवर लेखक दिग्दर्शक म्हणून त्यांची चांगली ओळख होती पण नाईलाजाने त्यांना अभिनयाकडे वळावे लागले होते.

    इम्तियाज यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1942 ला पेशावरला झाला. जन्मानंतर काही काळातच त्यांची आई त्यांना घेऊन मुंबईला आली. इम्तियाज यांनी 1951 मध्ये नाजनीन या चित्रपटाद्वारे पहिल्यांदा कॅमेर्‍यासमोर अभिनय केला. निर्माता पी.एन.अरोडा यांच्या नाजनीन या चित्रपटात इम्तियाज आणि अमजद या दोघा भावंडांनी ‘चांदनी रातों में जिस दम याद आ जाते हो तुम’ या तलत महमूद यांनी गायलेल्या गाण्यात बालकलाकार म्हणून काम केले होते. चित्रपटाचे नायक नायिका होते नासीर खान व मधुबाला. संगीत गुलाम मोहम्मद यांचे होते. नाजनीन या चित्रपटाचे दिग्दर्शक या मुलांचे काका नजीर (एन.के.झिरी) होते. यानंतर नजीर यांनी किशोर कुमार आणि श्यामा अभिनीत चार पैसे (1955) हा चित्रपट दिग्दर्शित केला आणि ते पाकिस्तानला निघून गेले. इम्तियाज यांनी नाजनीन सह नानाभाई भट्ट यांच्या वतन आणि अजून चार पाच चित्रपटातून बालकलाकार म्हणून काम केले.

    1962 मध्ये आलेला ख्वाजा अहमद अब्बास यांचा ‘ग्यारह हजार लडकियां’ या चित्रपटात इम्तियाज यांना प्रमुख भूमिका मिळाली पण त्यांना दिग्दर्शनाचे क्षेत्र खुणावत होते. त्याकाळी के.आसिफ ‘लव अ‍ॅण्ड गॉड‘ चित्रपट करत होते. इम्तियाज त्यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून उमेदवारी करु लागले. या चित्रपटाचे नायक गुरुदत्त होते. चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असतानाच गुरुदत्त यांचे निधन झाले. निर्माता शापुरजी पालनजी यांनी चित्रपटाला अर्थसहाय्य नाकारले त्यानंतर काही काळातच के.आसिफ यांचेही निधन झाले आणि चित्रपट अपूर्णच राहिला. याचदरम्यान इम्तियाज ‘हमारा घर’(1964) या चित्रपटासाठी ख्वाजा अहमद अब्बास यांनाही दिग्दर्शनात सहाय्य करत होते, त्यासोबतच अब्बास यांच्या शहर और सपना (1963) या चित्रपटाचे इंग्रजी रुपांतरण इम्तियाज यांनी केले. हा चित्रपट कार्लोवी वेरी इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये दाखविण्यात आला.imtiyaz-khan

    स्वतंत्रपणे दिग्दर्शक म्हणून त्यांना जिंदगी की राहे हा चित्रपट मिळाला. यात सुरुवातीला संजय खान आणि अलका नायक नायिका होते पण नंतर संजीवकुमार आणि राधा सलूजा नायक नायिका म्हणून घेण्यात आले. दुर्दैवाने हा चित्रपटही अपूर्ण राहिला. इम्तियाज यांचा संघर्ष पुन्हा सुरु झाला. चेतन आनंद यांच्या ‘हीर रांझा’ या चित्रपटासाठी ते पुन्हा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करु लागले. पण इम्तियाज जाईपर्यंत हा चित्रपट जवळजवळ पूर्ण होत आला होता. यानंतरच्या हसते जख्म या चित्रपटासाठी त्यांनी चेतन आनंद यांना दिग्दर्शनात सहाय्य केले. पण दिग्दर्शनात नशीब फारसे साथ देत नसल्याने, त्याकाळातच रामसे बंधूंकडून ऑफर झालेला दो गज जमींन के नीचे या चित्रपटातील खलनायकाची भूमिका त्यांनी स्वीकारली. हा चित्रपट बॉक्सऑफिसवर यशस्वी झाला आणि त्याने इम्तियाज यांच्या कारकिर्दीला वेगळेच वळण दिले. 1970 च्या दशकात त्यांनी यादों की बारात, धर्मात्मा, जख्मी, जोरो, काला सोना, कबीला आणि दरवाजा यासारख्या सुपरहिट चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका साकारल्यात. अभिनेता म्हणून त्यांचे नाव नावारुपाला येत असतांनाच एका वर्तमानपत्रात त्याकाळातील एका नामांकित नायिकेसोबतच्या त्यांच्या नात्याबाबत गॉसिप न्यूज छापून आली. यामुळे नाराज झालेल्या या नायिकेने इम्तियाज यांच्यासोबत सुरु असलेल्या जवळपास पूर्ण होत आलेल्या चारही चित्रपटांसाठी तारखा देण्यास नकार दिला. परिणामस्वरुप अभिनेता म्हणून इम्तियाज यांची सुरु झालेली कारकिर्द खालावली. अखेरीस त्यांनी पुन्हा दिग्दर्शनाकडे मोर्चा वळविला, त्यांना चित्रपटही मिळाले पण इथेही नशीबाने साथ दिली नाही. 1982 मध्ये आलेल्या ‘प्यारा दोस्त’ या चित्रपटाव्यतिरिक्त बाकी चित्रपट सुनीलदत्त रिना रॉय यांचा कृष्ण करतार रहीम, जितेंद्र, अमजद खान, बिंदू यांचा पत्थर की मुस्कान, फिरोज खान – सुलक्षणा पंडीत यांचा शिकार शिकारी का यासह इतर चित्रपट वेगवेगळ्या कारणांमुळे अपूर्णच राहिले.

    चित्रपटांमध्ये आपल्या लहान भाऊ (अमजद खान) एवढी प्रसिध्दी इम्तियाज यांच्या नशीबी नव्हती, त्यांनी दूरचित्रवाहिनींकडे लक्ष केंद्रीत केले. इथे मात्र त्यांच्या नशीबाने त्यांना साथ दिली. अनेक गाजलेल्या दूरचित्रमालिकांच्या दिग्दर्शनाने त्यांचे नाव यशस्वी दिग्दर्शकांच्या यादीत पोहचले. त्यांच्या यशस्वी मालिकांमध्ये अनेक गुजराती मालिकांसह दूरदर्शनच्या अनकही, नूरजहाँ, मानो या न मानो, स्टारप्लसकरिता दिवारें यासारख्या अनेक मालिका होत्या. इम्तियाज यांनी त्यांच्यापेक्षा 25 वर्षांनी लहान असलेल्या कृतिका देसाई या दूरचित्रवाहिन्यातील नावाजलेल्या अभिनेत्रीशी विवाह केला. नशीबाने साथ न दिलेल्या बहुआयामी व हरफनमौला लेखक, दिग्दर्शक, अभिनेता असणार्‍या इम्तियाज यांनी 16 मार्च 2020 ला या दुनियेला अलविदा म्हटले. त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रध्दांजली!

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here