पुणे विभागीय आयुक्तांना कोरोनाची लागण

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – येथे कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असतानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

आता मात्र पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनाच कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासकीय तपासणी दौरे आणि बैठकीदरम्यान कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं आहे.

सौरभ राव यांनी स्वतःला घरीच विलगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्याच्या विभागीय आयुक्तांना कोरोना रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे कोरोनाची लागण झाली असल्याने त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या लोकांना कोरोना चाचणी करून घेण्याचं आवाहन केलं आहे. तसेच नागरिकांनीही योग्य ती खबरदारी घ्यावी अशी विनंतीही त्यांनी केली.

मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नका आणि वारंवार हात साबणाने धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करा. असं आवाहन प्रशासनातर्फे वारंवार नागरिकांना करण्यात येत आहे. मात्र काही नागरिक बेजबाबदारपणे वागुन कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवण्यास मदत करत असल्याचं पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here