स्वच्छ प्रतिमेचा, उच्चशिक्षित, अभ्यासू राजकारणी : मनोहर पर्रीकर

योगेश शुक्ल

देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे बरोबर दोन वर्षापूर्वी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ६३ वर्षांचे होते. पर्रिकर यांच्या निधनाने भाजपने गोव्यातील पक्षाचा चेहरा आणि स्वच्छ प्रतिमेचा, अभ्यासू, उच्चशिक्षीत, परखड व प्रगल्भ विचारांचा नेता राजकारणाने गमावला मनोहर गोपाळकृष्ण पर्रीकर…या माणसाचे कर्तृत्व त्याच्या साधेपणात होते. यातील एक प्रसिध्द किस्सा…

सकाळी ६ ची वेळ..पणजीच्या रस्त्यांवर अगदी तुरळक वाहनं होती. बहुसंख्य गोंयकर अद्याप साखरझोपेत होते. पण नेहमीच्या सवयीनुसार एक स्कूटरस्वार आपल्या ऑफिसकडे निघाला होता. इतक्या सकाळीही पणजीच्या मुख्य चौकातील सिग्नल चालू होते. तो स्कूटरस्वार तिथे आला आणि लाल दिवा लागला आणि तो थांबला.त्याचवेळी मागून एक आलिशान गाडी भरधाव वेगाने येत होती. रस्त्यावर कुणीही नसताना तो स्कूटरस्वार लाल सिग्नलमुळे थांबेल असं त्या कारवाल्याला वाटलं नाही त्यामुळे अचानक कार थांबवताना त्याची तारांबळ उडाली.

रागाने खाली उतरला आणि त्या स्कूटरस्वाराला म्हणाला ‘”कित्या थांबलो रे?”
“सिग्नल बघ मरे'” स्कूटरस्वार म्हणाला. कारवाल्याचा पारा अधिकच चढला. ‘बाजू हो. तुका माहित असा मीया कोण असंय ता? xxxx पोलीस स्टेशनच्या PI चो झील!’
तो स्कूटरस्वार म्हणाला ‘अस्सें? मग तुझ्या बापसाक जाउन सांग की माका गोंय चो मुख्यमंत्री भेटलो होतो!!’ खजील झालेला कारवाला स्कूटरस्वाराचे पाय धरू लागला. पण त्याला थांबवत तो इतकंच म्हणाला की सिग्नल पाळत जा आणि तो ऑफिसकडे निघून गेला.
साधी राहणी आणि प्रामाणिक कामकाजाबद्दल प्रसिध्द असणाऱ्या मनोहर पर्रीकर यांनी आपल्या एकंदर कारकिर्दीत भारतीय राजकारणात महत्वाची भूमिका बजावली आहे. भारतीय राजकारणातील साधेपणा आणि नम्रता यांची अनेक उदाहरण आपल्या समोर आहेत.त्याचे सर्वात उत्तम उदाहरण म्हणजे मनोहर पर्रीकर.
म्हापसा येथे गौड सारस्वत ब्राह्मण कुटुंबात १३ डिसेंबर १९५५ साली पर्रीकरांचा जन्म झाला. लहानपणापासून त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार घडले. आपल्या संघ पार्श्वभूमीविषयी पर्रीकर नेहमीच अभिमानाने बोलत असत.उच्चशिक्षणासाठी पर्रीकर मुंबईच्या IIT मधे दाखल झाले.

मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्याच दिवशी त्यांनी दोन महत्वाचे निर्णय घेतले. गोव्यातील अवैध मायनिंग बंद केले आणि पेट्रोल- डिझेलवरचा कर २०% वरून ०.१% वर आणला. गोव्यात पेट्रोल २०रू. स्वस्त झाले. या निर्णयावर प्रचंड टीका झाली. होणारं प्रचंड महसुली नुकसान भरून निघणं अशक्य आहे आणि गोवा सरकार दिवाळखोरीत निघेल अशी भिती व्यक्त होऊ लागली. पण हिशोबी पर्रीकरांकडे सर्व प्लॅन तयार होता. त्यांनी दाबोलीम अंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानासाठी लागणार्या व्हाईट पेट्रोलवरचा करही घटवला आणि त्याबदल्यात विमान कंपन्यांनी गोव्यासाठीच्या तिकीटदरात कपात केली. त्यामुळे देशी- विदेशी पर्यटकांची संख्या प्रचंड वाढली. तसेच त्यांनी गोव्यातील कॅसिनोंवरचे करही वाढवले. अशा रीतीने गोव्यातील पर्यटन वाढले, स्थानिकांचे रोजगार वाढले, उद्योगांना चालना मिळाली आणि महसूली नुकसानही भरून निघाले.

मनोहर पर्रीकर हे भारताचे पहिले आयआयटीयन मुख्यमंत्री होते.१९९४ साली पर्रीकर जेव्हा पहिल्यांदा आमदार बनले तेव्हा राज्यात भाजप सरकारच्या केवळ ४ जागा होत्या. पण पर्रीकर यांनी ६ वर्षांत गोव्यात भाजप सरकारची सत्ता आणली. गोव्याचे तीन वेळा मुख्यमंत्रिपद सांभाळण्याचा त्यांना बहुमान मिळाला. २००० ते २००५, २०१२ ते २०१४ आणि १४ मार्च २०१७ ते निधनापर्यंत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून गोवा राज्याची धुरा सांभाळली. विशेष म्हणजे २०१३ मध्ये गोव्यात झालेल्या भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाचा प्रस्ताव मनोहर पर्रिकर यांनीच मांडला होता. पर्रीकर यांच्या एडमिनिस्ट्रेटिव्ह आणि ऑर्गेनाइजेशन स्किल्स मोदींना भावल्या. म्हणूनच मोदींनी २०१४ ला पर्रीकर यांना कॅबिनेटमध्ये घेत त्यांना संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली.. २०१४ ते २०१७ दरम्यान त्यांनी संरक्षण मंत्रिपद सांभाळले. दरम्यान, २०१७ मध्ये गोवा विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने भाजपने पर्रिकर यांच्या नेतृत्वाची चाल खेळत राज्यातील सत्ता आपल्याकडे राखण्यात यश मिळवले होते.

मी गोव्याच्या जनतेचा ट्रस्टी आहे , त्यामुळे जनतेचं नुकसान होईल असा एकही निर्णय मी घेणार नाही असं ते नेहमी म्हणत आणि गोव्याच्या जनतेचाही त्यांच्या शब्दांवर पूर्ण विश्वास असे, त्यांच्या कार्यकाळात गोव्याच्या प्रशासनातून भ्रष्टाचार जवळपास हद्दपार झालाय. एजंट, कॉंट्रॅक्टर, सरकारी कर्मचारी अगदी प्रामाणिकपणे कामं पूर्ण करत आहेत. गोव्याच्या अगदी लहानात लहान गल्लीबोळातील स्वच्छ, चकचकीत रस्ते पाहिले की याची साक्ष पटते. पर्रीकरांना निरनिराळ्या मार्गांनी लाच देऊन त्यांची प्रतिमा डागाळण्याचेही अनेक प्रयत्न झाले पण पर्रीकर कशालाच बधले नाहीत.

पर्रीकरांच्या धाकट्या मुलाला एकदा strokes चा प्रचंड त्रास सुरू झाला. जीव वाचवायचा असेल तर तातडीने मुंबईला न्यायला हवं असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यावेळी मोदी नावाच्या एका उद्योगपतीने स्पेशल विमानाने त्याला मुंबईला नेले. त्याला स्ट्रेचरवरून न्ह्यायचे असल्यामुळे विमानातील सहा सीटस् काढण्यात आल्या आणि त्यांचे पैसे भरले. पर्रीकरांच्या मुलाचा जीव वाचला. या मोदीचे मांडवी नदीत अनेक कॅसिनो आहेत आणि तिथे त्याने काही अवैध बांधकामे केली होती. ती बाधकामे पाडण्याचे आदेश पर्रीकरांनी दिले होते. आपल्यामुळे पर्रीकरांच्या मुलाचा जीव वाचवला त्यामुळे हा आदेश ते रद्द करतील अशा खात्रीने मोदी त्यांना भेटायला गेले.

कॉंग्रेसला याची कुणकुण लागली आणि आता पर्रीकर जाळ्यात सापडणार असं त्यांना वाटू लागलं. पण झालं उलटंच. पर्रीकरांनी मोदींना स्पष्ट सांगितले की एक बाप या नात्याने मी तुमचे आभार मानतो पण मुख्यमंत्री म्हणून माझा निर्णय बदलणार नाही. त्या संध्याकाळीच सर्व अवैध बांधकामे उद्ध्वस्त करण्यात आली. एवढंच नव्हे तर त्यांनी त्या सहा सीटच्या भाड्याचे पैसे मोदींना देऊन टाकले.

५८ वर्षांचे पर्रीकर १६ तास काम करत. मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचार्यांनाही त्यांच्यामुळे उसंत मिळत नसे. एके दिवशी काहीतरी महत्वाचं काम असल्याने त्यांचे सचिव रात्री १२ पर्यंत ऑफिसमधे त्यांच्यासोबत होते. जाताना त्यांनी विचारलं की उद्या थोडं उशीरा आलं तर चालेल का? यावर पर्रीकर म्हणाले की हो चालेल. उद्या थोडं उशीरा म्हणजे साडेसहापर्यंत आलात तरी चालेल! ते सचिव दुसर्‍या दिवशी साडेसहाला ऑफिसमधे आले तेंव्हा त्यांना वॉचमननं सांगितलं की साहेब सव्वापाचलाच आले आहेत!! अशा या नररत्नाची पारख नरेंद्र मोदी नावाच्या रत्नपारख्याने कधीच केली होती. म्हणूनच संरक्षणमंत्रीपदासारखं अतिमहत्वाचं खातं त्यांना मिळालं.

हॉटेलबाहेर एका रिक्षातून आलेल्या, स्वतःची बॅग स्वतः उचलणार्‍या आणि साधा शर्ट, पँट आणि चप्पल परीधान करून कोणत्याही संरक्षणाशिवाय आलेल्या नव्या संरक्षणमंत्र्यास पाहून त्यांना घ्यायला आलेला अधिकारी अक्षरशः थक्क झाला संरक्षणपदी असताना पर्रीकर एका लग्नाला गेले होते. कुठलाही बडेजाव न घेता आणि कोणतीही सुरक्षाव्यवस्था न घेता ते लग्नाला गेले होते. विशेष म्हणजे, वधू-वराला भेटण्यासाठी ते स्टेजखाली रांगेतही उभे राहिले होते. एरवी ही गोष्ट कुणाला समजलीही नसती. मात्र, लग्न समारंभास उपस्थित असलेल्यांपैकी एकाने पर्रीकरांचे छायाचित्र काढून सोशल मीडियावर पोस्ट केल्याने ही गोष्ट जगजाहीर झाली. मनोहर पर्रिकर वर्षभरापासून स्वादुपिंडाच्या कॅन्सरशी झुंज देत होते. गोवा मेडिकल कॉलेज, मुंबईतील लीलावती रुग्णालय, दिल्लीतील एम्स रुग्णालय तसेच अमेरिकेतही पर्रिकर यांनी उपचार घेतले. मात्र, पर्रिकर यांच्या प्रकृतीत सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत होता. एकीकडे कॅन्सरशी लढा देत असताना त्याच अवस्थेत पर्रिकर यांनी राज्याचा गाडाही सक्षमपणे हाकला. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याची धुरा वाहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here