मेवात (हरियाणा) – लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या तरुणाला ठार मारण्यात आले आहे. पूर्व वैमनस्यातून या तरुणाला जेसीबीखाली चिरडून ठार मारण्यात आले. ही घटना हरयाणातील मेवात येथे घडली असून हमीद असं मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्व वैमनस्यातून ही हत्या केल्याचे समोर आले आहे.
हमीदचा भाऊ सुलेमान याने पुनहाना पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली आहे. लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी 17 मार्च रोजी हमीद आणि सुलेमान सिंगलहेडी गावाला गेले होते. तिथून घरी परतत असताना वारिस, इमरान, रमजानी यांनी सुलेमान आणि त्याच्या भावाला रस्तात अडवले आणि त्यांच्यावर लाठीहल्ला केला. या हल्ल्यात सुलेमान आणि त्याचा भाऊ जबर जखमी झाले. जखमी अवस्थेत पडलेले असताना हमीदला आरोपींनी जेसीबीच्या लोडरने चिरडले. प्रचंड जखमी झालेल्या हमीदला वाचवण्यासाठी सुलेमानने बचावासाठी आरडाओरडा केला, यामुळे आरोपी पळून गेले.
हमीदला पुनहाना इथल्या रुग्णालात नेण्यात आले. तिथून त्याला नल्हड मेडीकल कॉलेजमध्ये हलवायला सांगितले. मात्र तिथे नेईपर्यंत वाटेतच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे. हत्येमागचे नेमके कारण समजले नसले तरी पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.






