मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – दिवंगत पार्श्वगायक किशोरकुमार यांच्या घरी चोरी करून पळालेल्या नोकराला सांताक्रुझ पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून अटक केली. हरनारायण दुर्गा यादव असे त्याचे नाव असून त्याची उत्तर प्रदेशच्या स्थानिक न्यायालयाने जामिनावर सुटका केली.
किशोरकुमार यांची नात सांताक्रुझ परिसरात राहते. तिच्याकडे हरनारायण हा गेल्या आठ वर्षांपासून घरकामाला होता. मंगळवारी सकाळी हरनारायण हा बॅगा घेऊन जात असल्याचे बंगल्यामधील सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आले. त्याने याची माहिती किशोरकुमार यांच्या नातीला दिली. घरातून वस्तू चोरीला गेल्याप्रकरणी किशोरकुमार यांच्या नातीने सांताक्रुझ पोलीस ठाण्यात धाव घेतली.
सांताक्रुझ पोलिसांनी गुन्हा नोंद केला. वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पथकातील उपनिरीक्षक शिवाजी शिंदे यांच्या पथकाने तपास सुरू केला. हरनारायण हा उत्तर प्रदेशला पळून गेल्याची माहिती समजताच पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशला रवाना झाले. तो उत्तर प्रदेशच्या बांदा रेल्वे स्थानकात थांबला असतानाच सांताक्रुझ पोलिसांनी हरनारायणला अटक केली. त्याला उत्तर प्रदेशच्या रेल्वे मोबाईल कोर्टात हजर केले असता त्याची जामिनावर सुटका झाली.






