पुणे (अजय पवार) – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड शहरात दहा दिवसांसाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे. आज लॉकडाऊनचा सातवा दिवस होता. मात्र यानंतर २३ जुलैपासून पुणे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन नसेल, अशी माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली आहे.
आज बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या काळात नागरिकांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले. त्यामुळे या लॉकडाऊननंतर पुन्हा लॉकडाऊन असणार नाही. मात्र, या पुढील काळातही आजपर्यंत शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन नागरिकांना करावे लागणार आहे. शहर आणि ग्रामीण भागात रुग्ण संख्या जरी वाढत असली, तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पुढे येऊन उपचार घ्यावेत. कोणत्याही रुग्णाला बेड कमी पडू देणार नाही. तसेच सध्याची परिस्थिती लक्षात घेता, शहरी भाग आणि त्यानंतर ग्रामीण भागातील रुग्णाची संख्या नियंत्रणात येण्यास मदत होईल, असा अंदाजही जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी व्यक्त केला.
दरम्यान, दिवसभरात १८१७ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. दिवसभरात ८३० रुग्णांना डिस्चार्ज. पुण्यात ३१ करोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू. दोन रुग्ण पुण्याबाहेरील. ५९१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात ९६ रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३९२०३. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १४७५७. एकूण मृत्यू -१००५. आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज- २३४४१.







