विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याचा तरुणीवर बलात्कार

नागपूर (कार्यालय प्रतिनिधी) – लग्नाचे आमिष दाखवून विधी अभ्यासक्रमाच्या २२वर्षीय विद्यार्थ्याने तरुणीवर बलात्कार केला. ही घटना कळमना भागात उघडकीस आली. तरुणीच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृणाल चंद्रशेखर राऊत (रा. वर्धमाननगर) या विद्यार्थ्याला अटक केली. ही तरुणीही शिक्षण घेत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृणालकडे चार श्‍वान आहेत. तरुणीकडेही तीन श्वान आहेत. ८ मार्चला तरुणीची कुणालसोबत श्वानांच्या प्रशिक्षण केंद्रात ओळख झाली. प्रेमसंबंध निर्माण झाले. लग्नाचे आमिष दाखवून विविध ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

दरम्यान, तरुणीने नातेवाइकांना माहिती दिली. त्यांनी लग्नाला होकार दिला. तरुणी नातेवाइकासह मृणालच्या घरी गेली. त्याच्या आई-वडिलांनी लग्नास नकार दिला. ‘वाट्टेल तेवढे पैसे घ्या व प्रकरण येथेच मिटवा’, असे मृणालचे आई-वडील तरुणी व तिच्या नातेवाइकांना म्हणाले. त्यांना शिवीगाळही केली. त्यानंतर तरुणीने कळमना पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here