नवी दिल्ली – कोरोनाच्या दुसऱया लाटेने शेतकरी आंदोलकांचीही चिंता वाढवली आहे. कृषी कायद्यांविरोधातील आंदोलनाचे प्रणेते, ज्येष्ठ शेतकरी नेते जोगिंदर सिंग उगराहा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. चार दिवसांपूर्वीच ते पंजाबमध्ये शेतकऱयांच्या रॅलीत सहभागी झाले होते.
75 वर्षीय जोगिंदर हे भारतीय किसान युनियनचे (एकता उगराहा) प्रमुख नेते आहेत. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात त्यांच्याच नेतृत्वाखाली पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाची सुरुवात झाली तेव्हापासून ते आंदोलनात सक्रिय सहभागी आहेत. दिल्लीच्या टिकरी बॉर्डरवरील धरणे आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले आहे.
12 मार्चपासून ते पंजाबमध्ये आहेत. 17 मार्चला त्यांनी शेतकरी रॅलीत हजर राहून भाषण केले होते. मागील तीन-चार दिवसांपासून त्यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे ते बठिंडा येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. सतत ताप असल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी केली होती. त्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे कुटुंबीयांसह शेतकरी आंदोलकांची चिंता वाढली आहे.
जोगिंदर यांनी रुग्णालयातून व्हिडीओच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मी ठीक आहे. लवकरच पुन्हा शेतकरी आंदोलनात सहभागी होईन. काही दिवसांपूर्वी आजारी पडलो. त्यानंतर माझ्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मात्र काळजीचे कारण नाही, असे जोगिंदर यांनी व्हिडीओ क्लिपद्वारे स्पष्ट केले.






