बारावीची परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी करत विद्यार्थी उतरले रस्त्यावर

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) – राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाइन घेण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतीच केली. शिक्षणमंत्र्यांच्या या निर्णयाचा विद्यार्थी विरोध करत असून बारावीची परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी करत विद्यार्थी थेट रस्त्यावर उतरले आहेत. याबाबत योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही यावेळी या विद्यार्थ्यांकडून देण्यात आला आहे. तर अंतर्गत मूल्यांकनाचा पर्यायाचाही विचार करावा, अशी मागणी यावेळी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे.

राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे अनेक जिह्यांमध्ये लॉकडाऊन करण्यात येत आहे. ही परिस्थिती अशीच राहिल्यास एप्रिल-मे महिन्यामध्ये होणाऱया परीक्षेदरम्यान लॉकडाऊनमुळे आम्हाला घरातून बाहेर पडणे शक्य होणार नाही. परिणामी परीक्षा देता येणार नाही. त्याचप्रमाणे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. तर आम्हाला अधिक मानसिक त्रासाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे परीक्षा ऑनलाइनच घेण्यात यावी, अशी भूमिका विद्यार्थ्यांकडून रविवारी मांडण्यात आली आहे.

ऑनलाइनच्या माध्यमातून अभ्यासक्रम शिकवण्यात आला, प्रिलियम्स ऑनलाइन घेण्यात आल्या, महाविद्यालय स्तरावरील परीक्षा ऑनलाइन घेण्यात आल्या. मग आमच्या परीक्षा ऑनलाइन का घेण्यात येत नाहीत, असा सवाल यावेळी विद्यार्थ्यांकडून उपस्थित करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here