नंदुरबार (प्रतिनिधी विजय निकम) – जिल्हा मागील काही महिन्यापासून अवैध धंद्याचे माहेरघर बनला असून सट्टा, मटका व जुगार, गुटखा, गांजा, अफु अशा विविध धंदयानी ग्रस्त झाला आहे, असे असले तरी पोलीस प्रशासन मात्र कार्यवाही न करता मुग गिळून बसले आहेत याउलट अवैध धंद्याच्या बाबतीत आपली सामाजिक जाणीव ठेवून लोकशाहीचा चौथा स्तंभ या अवैध धंद्यावर अंकुश ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र याविषयी आवाज उठविणाऱ्या पत्रकारांनाच खंडणी किंवा इतर गुन्ह्यांखाली अडकविण्याचे षडयंत्र सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात सुरु असलेल्या अवैध धंद्यांना वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांनी बातम्या देण्यास सुरुवात केली. मात्र यानंतर या अवैध व्यवसायिकांवर कारवाई करण्याऐवजी, बातमी देणाऱ्या पत्रकारांवरच बातमी प्रसारित न करण्यासाठी विविध राजकीय व सामाजिक पुढाऱ्यांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. सट्टा व मटका या अवैध धंदयाच्या बातम्या प्रसारित केल्या तर पत्रकारांना खंडणी किंवा इतर गुन्हांखाली अडकविण्याचे षडयंत्र सुरू असल्याची अत्यंत गुप्त माहिती मिळाली असून, भारतासारख्या.लोकशाहीप्रधान देशात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणविल्या जाणाऱ्या पत्रकारांची मुस्कटदाबी करण्याची तयारी सुरु आहे.
जनहितार्थबातमी प्रसारीत करण्याचा पत्रकारांना अधिकार आहे परंतु या अधिकारावरच हिटलरशाही पोलीस प्रशासन या माध्यमातून अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे का ? जिल्ह्यात सुरू असलेल्या सट्टा व मटका व्यवसाय करणाऱ्यांकडुन मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याशिवाय या अवैध धंद्यांना पोलीस प्रशासन संरक्षण देत आहे काय? असा प्रश्न आता जनमानसात निर्माण होत आहे.
कर्तव्यदक्ष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी या भोंगळ कारभाराकडे गांभीर्याने लक्ष देणे व अवैध धंद्यांवर कडक कारवाई करणे अपेक्षित आहे कारण स्थानिक पोलीस यंत्रणा सट्टा व मटका तसेच अवैध व्यवसायावर कारवाई करण्यास असमर्थ ठरत आहेत. पोलीस प्रशासनाच्या संरक्षणात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांना आळा बसेल का? घटनेच्या अधिकाराची पायमल्ली करत सट्टा व्यवसायाला उघडपणे पाठिंबा देणार यांवर कारवाई होणार का? आधिच महाराष्ट्राच्या गृहखातेच्या कारभाराविषयी तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेला लेटरबॉम्बमुळे एकूणच गृहखात्याच्या कार्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. असे असताना नंदुरबार जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाकडून अवैध धंद्यांना अभय देणे हे गृहखातेच्या भोंगळ कारभाराचे द्योतकच आहे. “कुंपणच शेत खात आहे ” हे गिरीश बापट यांचे गृहखात्याविषयीचे वक्तव्य खरे ठरत आहे.






