खरगोनमध्ये ऑनर किलिंग : प्रेमसंबंधांना विरोध, मुलीची मात्यापित्यांनीच केली हत्या

खरगोन (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका १७ वर्षीय मुलीची हत्या झाली. या प्रकरणात तिच्या पालकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. घरच्यांचा विरोध झुगारून अन्य जातीच्या तरुणासोबत प्रेमसंबंध ठेवल्यावरून तिची हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. कुटुंबीयांनी प्रियकराचा संपर्क क्रमांक डिलिट करण्यास सांगितले. मात्र, मुलीने त्यास नकार दिला. त्यानंतर तिचा गळा आवळून खून करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या बापाने १७ मार्च रोजी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. त्याचबरोबर मुलीचे अपहरण केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुलीचा मृतदेह एका विहिरीत तरंगताना आढळला होता.

मुलीच्या घरापासून काही अंतरावरच ही विहीर आहे. त्या विहिरीत मुलीचा मृतदेह आढळला होता. संवाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंगवाडा गावात मुलीचे कुटुंबीय राहतात. मुलीचा मृत्यू विहिरीत बुडून झाला नसल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले असून, तिचा गळा आवळून खून केल्याचे उघड झाले आहे. कुटुंबीयांचा जबाब नोंदवून घेतला. त्यावेळी त्यांनी दिलेल्या माहितीत वेगळेपणा दिसून आला. त्यामुळे पोलिसांना संशय आला होता. त्यांनी कसून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मुलीच्या प्रेमसंबंधांना विरोध होता, असे आरोपींनी सांगितले. आरोपींमध्ये मुलीचे आईवडील,, भाऊ आणि दोन जवळचे नातेवाइक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here